गोंदिया,दि.२५:आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुरेशजी हर्षे यांच्या जिल्हा निधीतून पुस्तक वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांसह वाचनप्रेमींना ज्ञानाची नवी दारे खुली व्हावीत आणि ग्रामीण भागात वाचन संस्कृती अधिक दृढ व्हावी, या संकल्पनेतून या विविध पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सविताताई चुटे, ग्रामपंचायत अधिकारी सुभाषजी पहारेले, उपसरपंच महेंद्र फरकुंडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश चुटे, कविता मेहर, बसंती दूधबर्वे, माजी पंचायत समिती सदस्य गणेश हरीनखेडे (आमगाव) आणि विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनोद चुटे उपस्थित होते. तसेच सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बंटी चुटे, उडान अकॅडमीचे संचालक हितेश शहारे, डिगंबर चुटे, विजय भांडारकर व माजी सरपंच (कालमाटी) यांची विशेष उपस्थिती लाभली.
वाचनालयातील या नव्या पुस्तकसंपदेमुळे कट्टीपार परिसरातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध विषयांवरील समृद्ध ज्ञान मिळण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्हा निधीतून वाचनालयाला हक्काची पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी सुरेशजी हर्षे यांचे मनःपूर्वक आभार मानले. लोकप्रतिनिधींच्या या अभ्यासू उपक्रमाचे कट्टीपार आणि परिसरातील ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे.





