
सडक अर्जुनी पंचायत समिती येथे आढावा सभेत घेतला विविध विषयांचा आढावा
सडक अर्जुनी – केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र सदर योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना मिळण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हयगयीपणा कारणीभूत ठरत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असे कडक निर्देश जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आयोजित आढावा सभेत दिले.
आज दिनांक 12 जानेवारी रोजी सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समितीचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, घरकुल विभाग, स्वच्छ भारत मिशन, पंचायत विभाग, बांधकाम विभाग कर्मचारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, विविध विभागाचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांची आढावा सभा जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते आढावा घेताना बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले, जिल्हा परिषद सदस्या सुधा रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, जिल्हा परिषद सदस्य निशा तोडसाम, पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये, प. स. सदस्या निशाताई काशिवर, प. स. सदस्या वर्षा शहारे, प. स. सदस्या सपना नाईक, पंचायत समिती सदस्य राजानी, प. स. सदस्या दिपाली मेश्राम, गटविकास अधिकारी डॉ.श्रीकांत वाघाये, सहायक गटविकास अधिकारी खोटेले, शिशिर येळे आदी उपस्थित होते.
यावेळी आढावा घेताना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनाचा, घरकुल योजना, शौचालय बांधकाम याबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजना पोहोचवून जनसामान्यांना त्याचा लाभ कसा देता येईल, याबाबत नियोजन करण्याचा सूचना देण्यात आले.





