23.9 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home क्रीडा राष्ट्राच्या विकासासाठी युवकांची भुमिका महत्वाची – श्रृती डोंगरे           

राष्ट्राच्या विकासासाठी युवकांची भुमिका महत्वाची – श्रृती डोंगरे           

0
27

गोंदिया,दि.13 : राष्ट्राचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर त्या देशातील युवकांची भुमिका महत्वाची असते. कोणत्याही देशाची प्रगती त्या देशातील युवकांच्या कार्यावरुन ठरविली जाते. जो देशाला तारुण नेतो तो तरुण, अशी युवकांची व्याख्या केली जाते. तेव्हा देशाचा आधारस्तंभ म्हणजे युवा शक्ती होय. म्हणून युवा शक्तीला जागृत करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रृती डोंगरे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया डिस्ट्रीक्ट रायफल शुटींग असोसिएशनचे सचिव अविनाश बजाज, राज्य क्रीडा मार्गदर्शक नाजुक उईके, अतुल बिसेन व विनेश फुंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व नेहरु युवा केंद्र गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने युवा दिन युवा सप्ताहाचे आयोजन दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे करण्यात आले.

        प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमेला माल्यार्पण करुन दिप प्रज्वलीत करण्यात आले.

        अध्यक्षीय भाषणातून क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी तारुण्याचे तीन तकार सांगतांना विशद केले की, तारुण्य म्हणजे तत्परता, तारुण्य म्हणजे तपस्वीता, तारुण्य म्हणजे तेजस्वीता आणि या तीन तकारातुनच देश घडविला जातो व देशाला योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य युवकांमध्येच आहे. कारण तो देशाच्या काळ्याकुट्ट अंधारातील एक प्रकाशकिरण असल्याचे सांगितले.

          युवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 12 ते 19 जानेवारी 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

        कार्यक्रमाचे संचालन ऋतुराज यादव यांनी केले तर उपस्थितांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवचरण चौधरी, किसन गावड व जयश्री भांडारकर यांनी परिश्रम घेतले.