26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home क्रीडा स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा फिलाटेलिस्ट अथर्व चंद्रकांत भुजाडे यांचा सत्कार

स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा फिलाटेलिस्ट अथर्व चंद्रकांत भुजाडे यांचा सत्कार

0
6

पालकमंत्री इंद्रनील नाईक व राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन यांच्या हस्ते गौरव
गोंदिया,17 ऑगस्ट  : स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त गोंदियातील युवा फिलाटेलिस्ट अथर्व चंद्रकांत भुजाडे यांचा आंतरराष्ट्रीय फिलाटेलिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक व राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

अथर्व यांनी AMSIPEX-26 या आंतरराष्ट्रीय एअरो व अॅस्ट्रोफिलाटेलिक प्रदर्शनात “AIRGRAPH and V-MAIL: Microfilm Mail of World War II” या विषयावर आपले संशोधनाधारित प्रदर्शन सादर केले होते. १४ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित या प्रदर्शनात त्यांच्या प्रदर्शनाला Youth Class मध्ये ८८ गुणांसह Gold Medal (सुवर्णपदक) प्राप्त झाले.
या उल्लेखनीय कामगिरीची World Records India यांनीही दखल घेतली. आंतरराष्ट्रीय फिलाटेलिक प्रदर्शनाच्या Youth Class मध्ये Gold Medal मिळविणारे सर्वात कमी वयाचे फिलाटेलिस्ट म्हणून अथर्व यांची नोंद करण्यात आली. अल्प वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेली ही कामगिरी गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
पुरस्कारप्राप्त प्रदर्शनामध्ये Airgraph आणि V-Mail या द्वितीय महायुद्धाच्या काळात वापरण्यात आलेल्या विशेष टपाल संप्रेषण प्रणालींचा इतिहास मांडण्यात आला आहे. युद्धकाळात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पत्रव्यवहार सुलभ करण्यासाठी या प्रणालींचा महत्त्वपूर्ण वापर करण्यात आला.मायक्रोफिल्म तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पत्रांचे आकारमान व वजन कमी करून त्यांचे प्रेषण करण्याची ही अभिनव व्यवस्था प्रदर्शनामध्ये विविध दस्तऐवज व फिलाटेलिक साहित्याच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर करण्यात आली आहे.
अथर्व यांचे हे यश केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आणि युवा पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.इतिहास, संस्कृती, टपाल वारसा आणि फिलाटेली यांसारख्या क्षेत्रांत युवकांनी पुढे यावे, यासाठी अशा उल्लेखनीय कामगिरीला मिळणारे प्रोत्साहन निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.