
नागपूर,दि.13ः बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांना पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी सकाळी स्पष्ट केली. तसेच या प्रकरणाचा अहवाल हायकमांडला पाठवला आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला.
नाशिक पदवीधर मतदार संघातून ऐनवेळी काँग्रसेचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्या ऐवजी त्यांचे सुपुत्र सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज स्पष्ट भूमिका मांडली.
नाना पटोले म्हणाले की, आम्ही सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. सर्व रिपोर्ट हायकमांडला पाठवले आहेत. त्यावर आज हायकमांडकडून निर्देश येतील. त्याप्रमाणे कारवाई करू, पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. त्यांनी फॉर्म न भरता पक्षासोबत फसवेगिरी केली आहे.
सुधीर तांबे यांनी आपल्या मुलाचा अपक्ष फॉर्म भरला. त्यानंतर भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे सांगितले. ही एक प्रकारे काँग्रेससोबत धोकादडी आहे. हे सारे हायकमांडला कळवले आहे. हायकमांडचा आज निर्णय येईल. त्यानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवू. बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही.
पटोले म्हणाले, नाशिकमध्ये भाजपने फॉर्म भरलेला नाही. त्या भागातले पदवीधर लोक अडाणी नाहीत. त्यांनाही हे सारे कृत्य कळते. भाजपकडून भय दाखवून घरे फोडण्याची कामे सुरू झालेली आहेत. आज भाजपला त्याचा आनंद होत आहे. मात्र, ज्यादिवशी भाजपचे घर फुटेल तेव्हा त्यांना घर फुटल्याचे दुःख कळेल, असा टोलाही त्यांनी हाणला.





