30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ रस्ते सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या- शीतल पुंड

रस्ते सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या- शीतल पुंड

0
30

blank

  • महिलांची जनजागृती बाईक रॅली
  • रस्ते सुरक्षा जागृती सप्ताह

          गोंदिया,दि.13 : मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याची गरज आहे. वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळणे व रस्ते सुरक्षितता हा सर्वच स्तरावरील प्राधान्याचा विषय असायला पाहिजे असे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी व्यक्त केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया यांच्या वतीने 11 ते 17 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. या निमित्ताने आज महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला श्रीमती पुंड यांनी हिरवी झेंडी दाखविली त्यावेळी त्या बोलत होत्या.

         उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, आरटीओ इन्स्पेक्टर संजीवनी चोपडे, सोनाली डोंगरवार, प्रा. माधुरी नासरे, भावना कदम, प्राची गुडधे, धर्मिष्ठा सेंगर, लता बाजपेयी, उमा महाजन, पूजा तिवारी, मंजू कटरे, करुणा श्रीवास्तव, दुलीचंद बुद्धे यावेळी उपस्थित होते. रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आज गोंदिया शहरात सुरक्षित वाहन चालविणे हा संदेश देण्यासाठी महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महिला अधिकारी, सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थीनी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.blank

         वाहतूक नियमांचे पालन न करणे, वेगाने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे व चुकीच्या बाजूने वाहन चालविणे अशा कारणांमुळे रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात घडत असतात. आपल्या देशात रस्ते अपघातात मृत्यूची संख्या वाढत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे वाहतूक नियमांचे पालन न करणे हे आहे. दुचाकीच्या अपघाताची सुद्धा हीच कारणे आहेत. वेगापेक्षा मानवाचा जीव महत्वाचा आहे. या विषयी जनजागृती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ही बाईक रॅली काढण्यात आली होती. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

        अतिशय शिस्तबद्धरित्या ही रॅली शहरातून काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनींनी विविध पोस्टरच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे महत्व नागरिकांना पटवून दिले. नेहमी होणाऱ्या अपघाताची कारणे सुद्धा समजावून सांगण्यात आली. “वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा”, “आवरा वेगाला, सावरा जीवाला” दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करा, अशा संदेशाच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. युवापर्व, वामा, आधार महिला संघटना, एनएमडी महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडर विद्यार्थीनी, वाहन डीलर्स महिला कर्मचारी, पोलीस विभाग महिला कर्मचारी यांचेसह शंभरहुन अधिक महिलांनी या रॅलीत सहभाग घेतला.

blank