
तुमसर-दोन दिवसांपूर्वी मोहाडी तालुक्यात एका वाघिणीला जेरबंद करत नाही तोच पुन्हा तुमसर तालुक्यात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहे.२१ जानेवारी रोजी बपेरा येथील शेतकरी कैलास शहारे यांच्या शेतात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्याने परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे.तुमसर तालुक्यातील चांदपूर परिसर जंगलव्याप्त असल्याने येथे वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. जंगलातील वाघ, बिबट शिकारीच्या शोधात रहिवासी परिसरात येतात. यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडतात. बपेरा हे गाव बावनथडी नदीच्या काठावर असून बागायती पिकाचे क्षेत्र आहे. कैलास शहारे हे शनिवारी त्यांच्या शेतात गेले असता त्यांना वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या. वनाधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पाऊलखुणांवरून हा वाघ वयस्क असल्याचे निदर्शनास आले. तो पुन्हा आल्यास खात्री व्हावी याकरिता शेतशिवारात कॅमेरे लावण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. हा वाघ नदीचे पात्र ओलांडून मध्यप्रदेशच्या दिशेने निघून गेला अशावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, खात्री होईपर्यंत शेतकरी, शेतमजुरांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे.