‘मनरेगा’ हे विकासाचे इंजिन – राज्यपाल रमेश बैस

0
16

मुंबई, दि. ०4 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागाला समृद्ध करणारी योजना असून खऱ्या अर्थाने ते विकासाचे इंजिन आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम होईल. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनेचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित ‘झेप अभिमानाची स्वाभिमानाची जगण्याची’ कार्यक्रमात राज्यपाल श्री. बैस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार ॲड. आशिष जयस्वाल, आमदार महेंद्र दळवी, रोहयो आणि इतर बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, ‘मनरेगा’ आयुक्त शांतनू गोयल व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल श्री. बैस म्हणाले, मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी आवश्यक कृषी, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात काम करता येते. राज्यात सध्या 27 हजाराहून अधिक कामे सुरु आहेत. ग्रामीण भागाला समृद्ध करणारी ही योजना आहे. समाजातील तळागाळातील वर्गाला सर्वसमावेशक बनविण्याची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याची ताकद या योजनेत आहे. या योजनेच्या माध्यमातून पन्नास टक्के महिलांना रोजगार मिळतो. त्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याचे कामही या योजनेच्या माध्यमातून होत आहे. ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्याचे काम राज्य शासन करेल, असे राज्यपाल म्हणाले. तसेच, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे योजनेच्या अंमलबजावणी मधील पारदर्शकता वाढेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण माणसाला सुखी, समृद्ध करणारी योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मनरेगा’च्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक कामे सुरु आहेत. किमान 200 प्रकारची कामे या योजनेच्या माध्यमातून करता येतात. त्यामुळे ग्रामीण माणसाला सुखी, समृद्ध करणारी ही योजना असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

ते म्हणाले की, समन्वयातून सुविधा संपन्न कुटुंब आणि ग्राम समृद्धी योजना अतिशय महत्वाची आहे. रस्ते, विहिरी, पाणंद अशा २३० योजना या मनरेगा अंतर्गत आहेत. या सर्व ग्रामसमृध्दीच्या योजना आहेत. या कामांना गती देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आशीर्वाद या कामाच्या माध्यमातून मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारचा आपल्याला पाठिंबा मिळाल्याने अतिशय कमी वेळात जनतेच्या हिताचे महत्वाकांक्षी धोरणात्मक निर्णय आपण घेतले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. त्यातून ५ लाख २१ हजार जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी ३८ हजार कोटी खर्च करतोय. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात मदत करण्याची भूमिका आपण घेतली. जे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे, त्याला अधिक प्रोत्साहन देण्याची भूमिका घेत मनरेगाच्या माध्यमातून काम देणारे हात तयार करण्याचे काम आपण करत आहोत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने निर्णय घेतल्यावर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. ‘मनरेगा’ची अंमलबजावणी करताना ते काम चांगले होत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ही एकच रथाची दोन चाके असल्याचे त्यांनी नमूद केले. गावातील माणूस सुखी, समृध्द झाला, तर राज्य विकासाकडे जाईल. त्यामुळे प्रत्येक गावात ही योजना न्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केल्या.

यावेळी मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, ‘मनरेगा’ योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान आपण केला. रोजगार हमी योजना ही राज्याने देशाला दिली. राज्यासाठी ही योजना संजीवनी ठरली आहे. ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी यांना मागणीप्रमाणे काम देणारी ही योजना आहे. या योजनेस गती देण्याचा प्रयत्न आपण केला. जिल्हा पातळीवर छाननी समिती रद्द केल्या. लेबर बजेट नव्याने मांडले. बदलामुळे लाभार्थी योजनेकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी राज्यपाल श्री. बैस, मुख्यमंत्री श्री. शिंदे, मंत्री श्री. भुमरे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मनरेगा आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनेचा शुभारंभ, रोजगार हमी योजना विभागाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन, यशोगाथा पुस्तक आणि व्हिडिओ सीरिजचे अनावरण, मनरेगा गीताचे लोकार्पण, फलोत्पादनाची ऑनलाईन मागणी करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचे लोकार्पण, महात्मा गांधी नरेगा मदत केंद्र, माहिती आणि निवारण टोल फ्री क्रमांक १८००२३३२००५ चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनरेगा योजनेतील कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

१७ विभागांचे अभिसरणातून सर्वांगीण ग्राम समृद्धी संकल्पना
रोहयोसह इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय, कृषी, जलसंधारण, ग्रामविकास, वने, पाणीपुरवठा व स्वच्छता, वित्त, नियोजन, ऊर्जा, महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन अशा १७ विभागांनी एकत्र येऊन विविध योजनांचे अभिसरण करून सुविधा संपन्न कुटुंब व सर्वांगीण ग्राम समृद्धी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले. ‘मनरेगा’अंतर्गत समृद्धी बजेट आपण मांडले. पाणी, माती आणि माणसाची काळजी घेऊन विविध कामे हाती घेतली. सगळ्यांच्या सहकार्यातून विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. आभार मनरेगा आयुक्त शांतनू गोयल यांनी मानले. यावेळी ‘मनरेगा’च्या माध्यमातून विकासात्मक काम करणाऱ्या यशकथांच्या चित्रफीत दाखविण्यात आल्या.