चंद्रपूर-शहरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवून दहशत माजवणार्या अट्टल गुन्हेगारास रामनगर पोलिसांनी पथके तयार करून वर्धा जिल्ह्यातून अटक केली असून, १,६५,३५0 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सूरज श्रीराम शेट्टी (कोरवन) असे कुख्यात आरोपीचे नाव असून आरोपीवर तेलंगाणा, आंध्रप्रदेश राज्यात घरफोडीचे १६ गुन्हे तर नागपूर व आदिलाबाद येथे चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
चंद्रपूर शहरातील गुलमोहर कॉलनीतील १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता कामावरून घरी जात असताना पांढर्या रंगाच्या दुचाकीवरून येणार्या इसमाने गळ्यातील मंगळसूत्र पळविले, त्याच्याच दुसर्या दिवशी २ एप्रिलला सिस्टर कॉलनीतील महिला आपल्या पतीसह पहाटे ५.३0 वाजता मॉनिर्ंग करीत असताना पांढर्या रंगाच्या दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला त्यानंतर पुन्हा ६ एप्रिलला रेव्हेन्यू कॉलनीतील पती-पत्नी मोपेड वाहनाने पहाटे ५.३0 वाजता मंदिरात जात असताना पांढर्या रंगाच्या दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तिने हिसकावून नेले असल्याच्या तीन तक्रारी रामनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या.
पोलिस निरीक्षक रामनगर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण पथकाचे तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. दि. १४ एप्रिल रोजी पठाणपुरा मार्गावरून पांढर्या रंगाचे वाहनाने हेल्मेट लावून शहरात प्रवेश केल्याची गोपनीय माहिती रामनगर गुन्हे अन्वेषण पोलिसांना प्राप्त होताच तपास सुरू करण्यात आला. यादरम्यान आरोपी एमआयडीसी पडोली मार्गाने भरधाव वेगाने जात असताना सपोनि हर्षल एकरे यांनी पोलिसांच्या चारचाकी वाहनाने आरोपीच्या वाहनाला मागून हलकी धडक दिली त्यात तो रोडखाली पडला, अंधाराचा फायदा घेत ताराच्या कुंपणातून पळून जाताना सपोनि एकरे व नापोशी किशोर वैरागडे यांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग केला. परंतु आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी एमआयडीसी जंगलात पाहणी केली. दरम्यान, त्याचे कपडे आढळले त्यात मिरची पावडरची पूड आढळली. आरोपीचे हेल्मेट व दुचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून पोऊनी सामलवार सह आंध्रप्रदेश, तेलंगाणा जाऊन आरोपी विषयी माहिती प्राप्त केली त्यानंतर पोलिसांना आरोपी वर्धा जिल्ह्यातील वर्धा शहरातील शांतीनगर परिसरातील तिरुपती अपार्टमेंट येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच त्याचे घरी गेले असता पोलिसांना पाहून तिथे असल्याने महिलेने घरातील लाईट बंद करून आरडाओरड केली त्यावेळी सपोनि सामलावार यांनी स्थानिक पोलीस स्टाफच्या साहाय्याने घरात प्रवेश केला असता आरोपी सूरज श्रीराम शेट्टी (कोरवन) आढळून आला. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून १,३६,५६0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिस, निरीक्षक राजेश मुळे, मपोनि लता वाढीवे, सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पो.हवा. रजनीकांत पुट्ठावार, प्रशांत शेंदरे आदींनी केली आहे.





