पुणे/वृत्तसेवा-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या तक्रारीवरून पुणे सायबर पोलिसांनी शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह 17 ते 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर कोणत्याही पुराव्याशिवाय आक्षेपार्ह पोस्ट शेअर करून बदनामी केल्याप्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने पुण्यात खळबळ उडाली आहे.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव जोडून, त्यांचे फोटो व व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. राजकीय हेतूने प्रेरित होऊन स्वतःची आणि कुटुंबाची समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक बदनामी केली गेल्याचा आरोप चाकणकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
चाकणकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी त्यांची 9 वर्षांपूर्वी एका जाहीर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. 18 मार्च 2026 रोजी खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर, जुन्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटोंचा चुकीचा अर्थ लावून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.
चाकणकर यांनी केलेल्या तक्रारीवरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे, अभिनेत्री दीपाली सय्यद, डॉ. आशा मिरगे, संगीता तिवारी आणि शरद पवार गटाचे सोशल मीडिया पदाधिकारी योगेश सावंत व मोहसीन शेख यांच्यासह 17 ते 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.यामध्ये सोशल मीडियावर बेकायदेशीरपणे फोटो प्रसारित करणे, जाणीवपूर्वक चारित्र्यहनन करणे, अश्लील किंवा अवमानकारक मजकूर पसरवणे आणि बदनामी करणे या गुन्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुणे सायबर पोलिसांनी या सर्व आक्षेपार्ह पोस्टचे स्क्रीनशॉट्स आणि पुरावे गोळा केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.
चाकणकर यांनी स्वतः जवळपास 19 विविध फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब अकाउंट्सवरून झालेल्या बदनामीकारक पोस्टचे स्क्रीनशॉट्स आणि डिजिटल पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत.
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि बाबा अशोक खरात याच्यावर एका महिलेवर तब्बल 3 वर्षे वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर उद्भवलेल्या राजकीय गदारोळामुळे आणि खरातच्या शिवानिका ट्रस्टमध्ये नाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपांमुळे रूपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
पुणे सायबर पोलिस सध्या त्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सचे आयपी अॅड्रेस आणि मूळ ओरिजिन तपासत आहेत. गुन्ह्यात नाव असलेल्या राजकीय नेत्यांना आणि सोशल मीडिया हँडल धारकांना लवकरच चौकशीसाठी पोलिस समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.





