गोंदिया : तालुक्यातील इर्री येथील झुडपी जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.२५) रात्री धाड टाकून तब्बल १९ जणांविरुद्ध कारवाई केली. यावेळी १२ जणांना जुगार खेळताना पकडण्यात आले. तर पोलिसांची चाहूल लागताच तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. पकडलेल्या आरोपींकडून ६८ हजार ३०० रुपये रोख, एक मोटारसायकल, १४ अँड्रॉइड मोबाइल, एक चारचाकी वाहन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख ४ हजार ५५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत होते. २५ ऑगस्ट रोजी एलसीबी पथकाला गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इरी येथील झुडपी जंगल परिसरात काही जण तासपत्तीवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. रात्री ११ वाजता संबंधित ठिकाणी धाड टाकली.
पोलिसांना पाहताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, १२ जण पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईत मोहित दीपक साखरे (वय २८) जब्बारटोला, नितेश राजू बागडे (२७) बाजपेयी चौक, दिनेश ऊर्फ राहुल राजकुमार चतुर्वेदी (१९) सतनामी मोहल्ला, यादव चौक, डोहेल कमलकुमार बारे (२१), सतनामी मोहल्ला, यादव चौक, मधुकर धनिराम गोंडाणे (५१) ठाणा, ता. आमगाव, शिवकुमार टेकलाल लिल्हारे (४२) न्यू लक्ष्मीनगर, मुकेश भागवत भोंडेकर (४२) बघोली, विलास घनश्याम मानकर (२४) गौतमनगर गोंदिया, प्रलय सुभाष मेश्राम (३५) रतनारा, आकाश दिलीप भिमटे (३२) छोटा गोंदिया, विक्की राजू मस्करे (२७) रतनारा आणि आशिष सुखदेव उके (२९) संजयनगर, गोविंदपूर हे १२ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून ६८ हजार ३०० रुपये रोख, ७० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल, २ लाख ६१ हजार रुपये किंमतीचे १४ अँड्रॉइड मोबाइल, ८ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन व जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत जुगार अड्डा चालविणाऱ्यांची नावे समोर
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, सदर जुगाराचा अड्डा किसन रमेश दमाहे (४५) रा. इरीं, मुकेश ऊर्फ बल्ला भगवानदास बिरीया (४५) मुरपार, रावणवाडी, सतीश तेजराम मेंढे (४०) सुपलीपार आणि जितू मोहनसिंग पाराशर (३८) संजयनगर, गोविंदपूर, गोंदिया हे चौघे मिळून चालवत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी एलसीबीचे पोलिस हवालदार संजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये १९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





