नागपूर :कुणी स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून दावा करते तर कुणी २०२४ ला कशाला आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असे म्हणतो. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्र्यांनाच मुख्यमंत्री संबोधले होते. असे असतानाच आता देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असे बॅनर नागपुरात झळकले आहे. तर दुसरीकडे सीएम एकनाथ शिंदे तीन दिवस सुटीवर गेले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सध्याच्या राजकीय घडामोडी बघता राज्याच्या मुख्यमंत्रीवरून चांगली चर्चा सुरू असताना नागपुरात बुटीबोरी भागात भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष व फडणवीस यांचे समर्थक असलेले बबलू गौतम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बुटीबोरी चौकात मोठे फलक लावले आहे. या फलकामुळे ग्रामीण व शहरात या फलकाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
बॅनरवरून फडणवीसांचा फटकारा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीली मुलाखत देतांना नागपूरच्या बॅनर प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ज्या कोणी ते बॅनर लावले आहेत ते त्यांनी काढून टाकावेत. अतिउत्साही लोकं असतात, तेच असे करतात.
मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदेंच
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 2024 मध्ये तेच मुख्यमंत्री होतील. त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू, असे फडणवीस म्हणाले.





