
गोंदिया,दि.29: जागतिक हिवताप दिनानिमीत्त 25 एप्रिल रोजी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. सदर प्रदर्शनीचे उद्घाटन डॉ.जयंती पटले, जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांनी केले.
या प्रदर्शनीत हिवताप, डेंग्यू तसेच इतर किटकजन्य आजाराविषयी सखोल माहिती देणारे फलक लावण्यात आले व माहितीपत्रक नागरिकांना वाटण्यात आले. किटकजन्य आजारास कारणीभूत असणारे घटक व त्यावर उपाययोजना जसे की, डास अळी, डास अळी भक्षक गप्पी मासे, शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बांधणे, साचलेल्या पाण्यात जळालेले इंजिन ऑईल टाकणे, धुरफवारणी यंत्र, किटकनाशक फवारणी यंत्र यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
डॉ.जयंती पटले यांनी हिवताप, डेंग्यू सारख्या किटकजन्य आजाराबाबत लोकांना माहिती देवून बचाव करण्याचे उपाय सांगितले. यामध्ये कोरडा दिवस पाळणे, मच्छरदानीचा वापर करणे, व्हेंट पाईपला जाळी बांधणे, ताप आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासणी करुन घ्यावे असे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.अश्विनी डोंगरे, डॉ.मनिष धकाते, डॉ.स्निग्धा ठाकुर, डॉ.वंदना पडोळे, डॉ.श्रृती बिसेन, समाजसेवक अधीक्षक अजय डोंगरे तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थी विष्णु वर्मा, संपदा अंजनकर, रोशनी मुंढे, क्षीतीजा झोडपे, कुणाल वधवानी, श्रृती शर्मा, अनुष्का येरपुडे, प्रकृती आर. यांनी प्रदर्शनीस भेट देऊन किटकजन्य आजाराबाबत माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी डी.पी.कुमरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा हिवताप कार्यालयातील आशिषकुमार बले व पंकज गजभिये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.एन.डोंगरे, श्री.ठाकुर, श्री.जायभाये, शितलकुमार दोनोडे, जितु बैसवारे, अजय चौधरी, विजयसिंग बनाफर व सुनिल हातीपछेल यांनी मोलाचे परिश्रम घेतले.




