खेमेंद्र कटरे / गोंदिया: एकीकडे जिल्ह्यात नव्या उद्योगांची वाणवा असताना, दुसरीकडे गोंदिया एमआयडीसीतील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय मालमत्तेची प्रशासकीय दुर्लक्षामुळे धुळधाण उडाली आहे. एमआयडीसी परिसरातील विश्रामगृह (Rest House) आणि सामाईक सुविधा केंद्राची (CFC – Common Facility Centre) इमारत गेल्या अनेक वर्षांपासून पार बेवारस अवस्थेत पडून आहे. देखभालीअभावी या इमारतींची कमालीची दुरवस्था झाली असून, आज हे परिसर मद्यपी आणि समाजकंटकांचा अड्डा बनले आहे.
स्थानिक उद्योजक आणि नागरिकांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी लाखो रुपये खर्चून या इमारती उभारण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या अनास्थेमुळे आज इमारतींमधील खिडक्या, दारे, वायरिंग आणि विजेचे महागडे साहित्य चोरीला गेले आहे. इमारतींच्या अवतीभवती झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले असून, परिसरात दारूच्या बाटल्यांचा सडा आणि कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कोट्यवधींच्या या मालमत्तेचे रक्षण करण्यास एमआयडीसी प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
उद्योगमंत्र्यांचे लक्ष जाणार का?
राज्याचे औद्योगिक विकास मंत्री लवकरच गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. औद्योगिकीकरणाच्या बाता मारणारे मंत्री महोदय एमआयडीसीच्या या दयनीय आणि बेवारस इमारतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना झाडणार, की या दुरवस्थेकडे डोळेझाक करून सरळ निघून जाणार, याकडे आता सर्व जिल्ह्याचे आणि स्थानिक उद्योजकांचे लक्ष लागले आहे.




