भंबोडी येथील ग्रामसेवक व ग्राम पंचायतीचे कार्यकाळाची चौकशीचे आदेश

0
37

(नितिन आगाशे)
तिरोडा (दि.३1)- तालुक्यातील ग्राम भंबोडी येथील घरकुल वितरणात ग्राम पंचायत तसेच ग्रामसेवक राउत यांनी गाव नमुना ८- अ व इतर दस्तावेजामध्ये हेराफेरी व बनावटी कागदोपत्र तयार करुन शासनाची व भंबोडीच्या नागरिकांची दिशाभूल केली. याप्रकरणी भंबोडी येथील ग्रामसेवक तसेच ग्राम पंचायत यांचे कार्यकाळाची चौकशीचे आदेश पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष व निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया स्मिता बेलपत्रे यांनी दिले आहेत.
भंबोडी येथे ज्या लोकांचे पक्के घर आहेत, त्यांना घरकुलाची आवश्यकता नाही तशा लोकांना नमुना आठ (८) अ मध्ये हेराफेरी करुन घरकुलाचा लाभ देण्यात आला. परंतु ज्या लोकांचे घर कच्चे आहेत, त्यांना आवश्यक असुनसुद्धा घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. ज्या लोकांजवळ ५ ते १० एकर शेती आहे. अशाही लोकांना घरकुल देण्यात आले. मोल मजुरी करणाऱ्या, गरीब, हातावर पोट असलेल्याना घरकुलाचा लाभ न देता ज्या लोकांना शासकीय नौकरी तसेच पेंशन लागु आहे. अशा लोकांनादेखील घरकुलाचा लाभ देण्यात आला. काही लोकांनी तर घरकुल बनविलेच नाही. पण दुसऱ्याच्या घरासमोर उभे राहून फोटो काढले व पैशाची उचल केली. ग्राम पंचायत भंबोडी येथे संबंधित विभागाचे अधिकारी गावामध्ये आले नाहीत व चौकशी देखील केली नाही व घरकुले देण्यात आली.
सदर प्रकरणाची तक्रार भंबोडी येथील सामाजिक कार्यकर्ता दुर्गाप्रसाद मोहन डिंकवार यांनी खंड विकास अधिकारी पंचायत समिती तिरोडा, जिल्हाधिकारी गोंदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया व मुख्यमंत्री, सचिवालय कक्ष अधिकारी क्रमांक १०२ यांना दिली होती. ग्रामसेवक व ग्राम पंचायत कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करुन कारवाही करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ११ एप्रिल २०२३ ला पत्र क्र./प्रस्तुत/कावि/१४२/२०२३ नुसार चौकशीचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.