
गोंदिया,दि.27-देशांतर्गत आणि राज्यात अतिरेकी कारवायांच्या घटना घडत असताना जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्थेसाठी सर्वत्र ‘ मॉक ड्रील’ मोहीम एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने राबवण्यात येते.यातून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे.काय उणिवा राहिल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो.आणि पुढील काळात त्या होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येते.त्या अनुषंगाने येथील बिरसी विमानतळावर जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, बिरसी विमानतळ डायरेक्टर शफीक शहा यांचे मार्गदर्शनाखाली सोमवारच्या सायंकाळी अँटी हायजॅकिंग मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.
3 सशस्त्र आतंकवादयांनी दहशत पसरविण्याचे उद्देश्याने आणि राज्य शासनास व जिल्हा प्रशासनास वेठीस धरण्याकरीता अचानक बीरसी विमानतळावरील प्रवासी विमानातील प्रवाशाना वेठीस धरल्याची माहीती विमानतळ सुरक्षा यंत्रणेकडून मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोचली.त्यांनतर विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपायोजना म्हणून प्रवाशांची कोणतीही जिवीत आणि वित्तहानी न होऊ देता आतंकवाद्यांना मॉक ड्रिल दरम्यान जेरबंद करून ताब्यात घेवून जखमींना अॅम्बुलन्सव्दारे दवाखान्यात पाठविण्यात आले.वेठीस धरलेल्या प्रवाश्यांना मोकळे करण्यात आले.
अँटी हायजॅकिंग मॉक ड्रील मोहिमेत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर,बिरसी विमानतळ प्रमुख डायरेक्टर शफीक शहा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने, पोलीस उपअधीक्षक नंदिनी चांदपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथक, बिडीडीएस पथक, पोलीस मुख्यालय येथील पोलीस पथक, पो. ठाणे रावणवाडी, गोंदिया ग्रामीण येथील पोलीस पथक, अंगुलीमुद्रा विभाग,विमान सुरक्षा बल व स्टाफ, वैदयकीय स्टाफ, अग्निशामक दल व जलद कृती दल (क्युआरटी), दंगल नियंत्रण आरसीपी 2 पथके),बिनतारी संदेश विभाग, मोटर परिवहन विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा सुरक्षा शाखा, जिल्हा विशेष शाखा, नक्षल सेल येथील पोलीस अधिकारी अंमलदार इत्यादींनी सहभाग नोंदविला.





