
मुंबई,दि.-5- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सभागृहात होत असलेल्या शरद पवार यांच्या गटाच्या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंडखोर गटावर टीका केली. अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या विठ्ठल आणि बडवे या टीकेला जयंत पाटील यांनी उत्तर दिले. तसेच मला कानात सांगितले असते, तरी मी पदावरून पायउतार झालो असतो, असंही जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटलांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
- एवढ्या कमी कालावधीत मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले. कोणालाही गाड्या करून बोलावले नाही, लोक स्वतःच्या खर्चाने आले.
- अनेक संकटे आली तरी प्रत्येकवेळी शरद पवार धाडसाने सामोरे गेले.
- 25 वर्षात अनेकांनी अनेक वेळा पक्ष मोडण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही त्याला दाद दिली. आज काही जण बाहेर गेले त्याचे आम्हाला शल्य आहे.
- पवार साहेबांच्या आजुबाजुला बसणारे आज नाहीत, याचे दुःख आणि शल्यदेखील आहे.
- प्रत्येक संकटात, अडचणीत पवार साहेब सर्वांच्या मागे उभे राहिले आहेत.
- मुंबईचा प्रदेशाध्यक्ष नेमले नाही, कारण प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक तुरुंगात गेले म्हणून त्यांना काढायचे का? मुंबईच्या नेमणुका मी करत नाही.
- मी पाच वर्ष पक्षाचा अध्यक्ष राहिलो, तेव्हा पक्षाचेच काम केले.
- तुरुंगवास भोगून आले तेव्हा तुमच्या डोक्यावर फुलेंची पगडी ठेवली तेव्हा बडवे आडवे आले नाही का.
- ज्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले.
- 2019 च्या वेळी पवार साहेबांनी मंत्री केले तेव्हा बडवे आडवे आले नाही का?
- देशात सध्या पक्षाची चोरी करणाऱ्यांचा थयथयाट सुरू आहे.
- महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरू राष्ट्रवादी संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- शरद पवार नावाचा झंझावात महाराष्ट्रात फिरू लागला तर काय होते हे सर्वांनी पाहिले आहे.
- वय कितीही झाले तरी या नेत्याचा भारतात दरारा आहे.
- पवार साहेबांच्या शब्दाच्या पलिकडे जात नाही, हीच आमची चूक
- बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पाहायच्या असतात
- साहेब म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण
- पक्षातली गर्दी कमी झाली आहे, त्यामुळे कोल्हे साहेबांनी पक्षाचे प्रचार प्रमुख व्हावे, संपूर्ण महाराष्ट्रात फिरू, महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.
- शिवसेनेची साथ सोडून गेले त्यांची तक्रार काय होती, आता तीच तक्रार पुन्हा तिथे येऊन बसली असेल, तर उद्धव ठाकरेंच्या आमदारांच्या मनात परत फिरायचे वेध लागले आहेत, हे नक्की.
- सर्वात जास्त 105 आमदार असलेल्या भाजपचे 8 मंत्री पण 40 आमदार असलेल्यांचा मुख्यमंत्री
- दुसऱ्याची कबर खोदता – खोदता स्वतःचीच कबर खोदण्याचे काम सध्या सुरू आहे.
- महाविकास आघाडीला तीन पक्षांची गाडी, रिक्षा म्हणून हिणवत होते, पण रिक्षा एवढी चांगली चालत होती, की आपणही रिक्षात बसावे म्हणून यांनीही तसे केले.
- मला कानात सांगितले असते, तरी मी लगेचच पद सोडले असते.
- विचलित होणाऱ्या क्षणातून सावरून आपले मूळ जे आहे, तिकडे परत गेले पाहिजे.
- विधानसभा-लोकसभा निवडणुका कधीही होऊ शकतात. उद्धव ठाकरेंबाबत महाराष्ट्रात सहानुभूती आहे. आज यांच्या घोडचुकीमुळे महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे उभा राहिला आहे.
शेर सादर करत दिला इशारा
जयंत पाटील यांनी या भाषणाच्या अखेरीस शेर सादर करत विरोधकांना म्हणजे बंडखोरांना इशारा दिला. ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना बाजू ए कातील मे है…’, आणि ‘कौन कहता है आसमान मे छेद नही होता, एक पत्थर तो तबियत ते उछालो यारो..’ असे शेर सादर करत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम केले.
जयंत पाटलांनी उपस्थितांना शपथ दिली
मी आज ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, आदरणीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षता आणि नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत कार्यरत राहील. आदरणीय पवार साहेबांपासून दूर गेलेल्या कृतघ्न लोकांना मी कधीही साथ देणार नाही. पवार साहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, असे कोणतेही कृत्य करणार नाही. पवार साहेबांच्या विचाराच्या मार्गावरून आयुष्यभर चालण्याची मी आज गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहे.





