
मालवण :-दांडी येथील माजी नगरसेवक पंकज सादये यांना फोडत भाजपने ठाकरे गटाला हादरा दिला. मात्र ठाकरे गटाने दोनच दिवसात भाजपला धक्का देत एका माजी नगरसेवकाच्या बदल्यात राणे समर्थक तीन माजी नगरसेवकांना फोडत ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. या माजी नगरसेवकांमध्ये लीलाधर पराडकर, संतोष उर्फ बाबू कांदळकर, संतोषी कांदळकर यांचा समावेश असून भाजपच्या वॉर्ड अध्यक्ष अंजली लीलाधर पराडकर यांनीही कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी हा पक्षप्रवेश झाला.
दांडी भाग हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा आहे. इथे दगडालाही शेंदूर फासला जातो. पण शेंदूर फासला म्हणून त्यात देवपण येतेच असे नाही. एखादा माजी नगरसेवक गेला म्हणून शिवसेनेला फरक पडणार नाही. दांडी हा शिवसेनेचा अभेद्य बुरुज असून अशा छोट्या मोठ्या धक्क्यांनी या बुरुजाची कपची सुद्धा हलणार नाही, असे प्रत्युत्तर ठाकरे शिवसेनेकडून यावेळी देण्यात आले. या पक्ष प्रवेशानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, यतीन खोत, मंदार ओरसकर, महेश जावकर, गणेश कुडाळकर, सेजल परब, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, पूनम चव्हाण, स्वप्नील आचरेकर, निना मुंबरकर, अन्वय प्रभू, यशवंत गावकर, मंदार गावडे, श्वेता सावंत, नंदा सारंग, महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, राजा शंकरदास, सन्मेष परब, बंड्या सरमळकर, सिद्धेश मांजरेकर, समीर लब्दे, सदा लुडबे, किरण वाळके, दीपा शिंदे, गौरव वेर्लेकर, तृप्ती मयेकर, निनाक्षी शिंदे, सुर्वी लोणे, अंजना सामंत, माधुरी प्रभू, दादा पाटकर, सचिन गिरकर, पॉली गिरकर, सोमा लांबोर, रोशन कांबळी, करण खडपे, चंदू खोबरेकर, बाबू वाघ, भाई चोपडेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
️️यावेळी आमदार वैभव नाईक यांनी लीलाधर पराडकर आणि बाबू कांदळकर यांना शिवसेना पक्षात योग्य तो मान सन्मान देण्याची ग्वाही दिली. लीलाधर पराडकर यांनी आम्हाला स्वतः संपर्क करीत पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली. आज शिवसेनेकडे नाव नाही, चिन्ह नाही, तरीपण सर्वजण आज आमच्या पक्षात येत आहेत. हीच शिवसेनेची ताकद आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले काम सर्वानी पाहिले आहे. तोक्ते वादळावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात मदत मिळवून दिली हे लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे जाणाऱ्यांना थांबवू नका. येणाऱ्यांचं स्वागत करा. हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. आज शिवसेनेकडे काहीही नसताना शिवसेनेचे ११ खासदार निवडून येतील आणि विधानसभेत महाविकास आघाडीचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा सर्वे आहे. म्हणून हे सरकार निवडणुका घेत नाही. येत्या डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत आहेत. त्यांचे आम्ही स्वागतच करू. पण किल्ल्यावर पाणी, लाईटच्या कामासाठी ठाकरे सरकारने १० कोटी मंजूर केले होते. मात्र आताच्या सरकारने या निधीला स्थगिती दिली. त्या कामावरील स्थगिती उठवावी, अशी मागणी त्यांनी केली. मागील पालिका निवडणुकीत लोकांनी ज्या विश्वासाने आमच्या ताब्यात पालिका दिली, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ दिला नाही. १५ वर्षात झाली नाही, एवढी कामे ५ वर्षात झाली असेही त्यांनी स्पष्ट केले.
संदेश पारकर म्हणाले, मालवण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील जनता बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेम करणारी आहे. काल आमच्यातील एक गेला. आज त्यांचे तीन माजी नगरसेवक आणले. वैभव नाईक यांच्यासारखे नेतृत्व आज मालवणला मिळाले आहे. परमेश्वर देखील माझा पराभव करू शकत नाही असा अहंकार झालेल्या नारायण राणे यांना अस्मान दाखवण्याचे काम वैभव नाईक यांनी करून दाखवले. विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक विजयाची हॅट्रिक करणारच आहेत. त्यावेळी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता येऊन जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून वैभव नाईक असतील. विरोधी पक्षात असताना देखील ते विकास कामासाठी फिरत आहेत. मग सत्ता आल्यावर विकासासाठी ते निधी कमी पडू देणार नाहीत. वैभव नाईक यांच्या समोर निलेश राणे उमेदवार असले तर वैभव नाईक यांची आणखी दहा हजार मते आपसूकच वाढतील आणि ते किमान ४० हजाराने विजय मिळवतील, असे सांगून कोणतीही निवडणूक आली की नारायण राणे, नितेश राणे आणि आता निलेश राणे… राणेंशिवाय अन्य उमेदवार जिल्ह्यात जन्माला आले नाहीत का ? सत्ता स्वतःकडे ठेवण्याचा हा राणे कुटुंबियांचा प्रयत्न असल्याचा आरोप पारकर यांनी केला. यावेळी हरी खोबरेकर, नितीन वाळके, सेजल परब, पूनम चव्हाण यांनी विचार मांडले.





