
कोल्हापूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हापुरात चांगलाच झटका बसला. मराठा आरक्षासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्ताने ध्वजारोहण केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत गोंधळ घातला.
सकल मराठा समाजाचे कोल्हापूर येथील कार्यकर्ते बाबा इंदुरीकर यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या संदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करत आक्रमक भूमिका देखील घेतली होती. या सर्व बाबींवर शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर येत असलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठक घ्यावी अशी लेखी मागणी देखील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्यांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
