खाजगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

0
15

चंद्रपूर: बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली कंत्राटी पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करण्यात यावी, परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, यासह राज्य सरकारच्या खाजगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शिक्षण-नोकरी बचाव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. आक्रोश मोर्चा दीक्षाभूमी मार्गे जटपुरा गेट, गांधी चौक ते जटपुरा गेट, पाणी टाकी चौक मार्गक्रमण करीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

आमदार सुधाकर अडबाले, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोधीया, माजी नगरसेवक सेवक पप्पू देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे , कुणाल चहारे यांच्यासह अनेक नेते यात सहभागी झाले होते. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ६ सप्‍टेंबर २०२३ रोजी शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्ययंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार असल्याचा शासन निर्णय जारी केला.राज्य सरकार नवी वेठबिगारी निर्माण करू पाहत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

जन आक्रोश मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. यावेळी राज्यातील विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक, राज्य कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शिक्षण-नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करून राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने देण्यात आला.
मोर्चातील मागण्यांवर विद्यार्थ्यांनी शासनाप्रती रोष व्यक्त केला. त्यानंतर विविध महापुरुषांच्या वेशभुषेतील युवक-युवतींच्या हस्ते निवासी जिल्हाधिकारी यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले व सदर मागण्यांचे निवेदन शासनाकडे तात्काळ पाठविण्यात येईल, अशी ग्वाही दिली. शेवटी शपथ घेऊन राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.