नियमांना डावलून परिचराचे स्थानांतरण;जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा प्रताप

0
34

देवेंद्र रामटेके
गोंदिया-(ता-6)शासकीय कर्मचाऱ्यांची बदली करतांना या संदर्भात शासनाने काही मार्गदर्शक तत्वे ठरवून दिली आहेत.त्या नियमांना अनुसरूनच कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येते. परंतु नियमात बसत नसताना सुद्धा एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियमबाह्य बदली करण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात उघडकीस आला. प्रकरण उजेडात येताच “तो मी नव्हेच” अशी भूमिका घेत विभागातील वरिष्ठ अधिकारी सारवासारवीच्या कामाला लागले आहेत.
गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन विभागाचे गोंदिया तालुक्यातील आसोली येथे श्रेणी -1चे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. सदर दवाखाना वैद्यकीय अधिकार्‍या अभावी मागच्या तीन वर्षापासून वाऱ्यावर आहे.असे असले तरी या दवाखान्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा देण्याचे काम येथील एकमेव कर्मचारी नंदेश्वर नामक परिचर करीत आहे. परंतु त्याची ही मागच्या तीन महिन्यापूर्वी नियमबाह्य पद्धतीने बदली आरोग्य विभागात करण्यात आली.सदर परिचर हा मागच्या अठरा वर्षापासून पशुसंवर्धन विभागात कार्यरत आहे.या विभागात मध्यंतरी काटी येथील दवाखान्यात सेवा बजावीत असताना त्याच्या मानेवर म्हशी ने सिंग मारल्यामुळे तो अपंग स्वरूपात आहे. असे असले तरीही त्याच्या हातून इमानेइतबारे विभागाची सेवा देण्याचे काम सुरू आहे. असे असतानाही केवळ आकसापोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची बदली नियमबाह्य पद्धतीने आरोग्य विभागात केली. नियमानुसार बदली हि ज्या विभागात कार्यरत आहे त्याच विभागातील अन्य ठिकाणी होणे गरजेचे होते परंतु तसे न करता केवळ अकसापोटी त्या गरीब कर्मचाऱ्याचे स्थानतरण आरोग्य विभागात करण्यात आले. आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार त्याने विभागीय आयुक्त तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या कडे केली. परंतु अद्यापही नियमबाह्य बदली करणाऱ्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई झाली नाही. एवढेच नव्हे तर मागच्या तीन महिन्यापासून त्याचे पगार थांबविण्यात आले. त्यामुळे सदर परीचराच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. आपल्यावर झालेला अन्याय त्वरीत दूर करून नियमबाह्य झालेली बदली रद्द करण्यात यावी अन्यथा कुटुंबा समवेत उपोषणास बसेन अशी मागणी मनोहर नंदेश्वर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

सदर बदलीचे अधिकार आपल्याला नाही. हे अधिकार सामान्य प्रशासन विभागाला आहेत.त्यामुळे या बदलीशी आपला कोणताही संबंध नाही.-डाॅ.कांतीलाल पटले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. गोंदिया