गोंदिया, दि.28 : सध्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत विमा संरक्षीत क्षेत्र नुकसानग्रस्त झाल्यास त्या अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते.
काढणी पश्चात नुकसान या घटकांतर्गत भात पिकाच्या काढणीनंतर शेतात कापणी करुन पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते. कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या भात पिकाचे काढणीनंतर दोन आठवड्याच्या आत (14 दिवस) अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन योजनेच्या निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.
काढणी पश्चात नुकसान या जोखीमेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानी बाबतची सूचना युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड या पीक विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक 18002005142/ 18002004030, विमा कंपनीचा ई-मेल [email protected], विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी कार्यालय व ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा इत्यादीद्वारे नुकसानी बाबतची पुर्वसूचना दिल्यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे भात पिकाचे काढणीनंतर नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी नुकसानी बाबत विमा कंपनीला पुर्वसूचना द्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.