युवा महोत्सवातून युवकांच्या कला-गुणांना वाव – अनिल पाटील

0
23

. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

     गोंदिया, दि.01 : जीवनात प्रत्येकाला एकतरी छंद असणे आवश्यक आहे. प्रत्येक युवकांमध्ये काहीतरी सुप्त गुण असतात, परंतु त्यांना पाहिजे तसे व्यासपीठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांच्या कला-गुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व कृषि आयुक्तालय, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाद्वारे संथागार, गोंदिया येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालक अजित अडसुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

        श्री. पाटील पुढे म्हणाले, युवकांमध्ये असलेल्या कला-गुणांना समोर आणण्यासाठी तसेच आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी शासन व अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. युवकांच्या व्यक्तीमत्वाच्या विकासासाठी व कला-गुणांना वाव देण्यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे अशाप्रकारच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होवून आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करुन व्यासपीठ उपलब्ध करुन घ्यावे. जिल्हास्तरावरील युवा महोत्सवातून स्पर्धेच्या माध्यमातून विभागीय स्तरावर व पुढे राज्यस्तरावर आपल्या अंगी असलेले कला-कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध होत असते असे त्यांनी यावेळी सांगितले. या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवून युवा महोत्सव कार्यक्रमाचा लाभ घेवून भरपूर आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत विस्तृत माहिती विशद केली.

        कार्यक्रमास क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले, उपविभागीय कृषि अधिकारी देवरी मंगेश वावधने, तालुका कृषि अधिकारी सालेकसा धनराज तुमडाम, तालुका कृषि अधिकारी तिरोडा गजानन चव्हाण, कृषि अधिकारी पवन मेश्राम, स्काऊट-गाईडच्या जिल्हा समन्वयक चेतना ब्राम्हणकर, रविंद्र वाळके, अनिल सहारे यांचेसह स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवचरण चौधरी, आकाश भगत, शेखर बिरनवार, जयश्री भांडारकर, विनेश फुंडे यांनी परिश्रम घेतले.

      याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मानवी जीवनात पौष्टिक तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे पौष्टिक तृणधान्याची जनजागृती करण्याकरीता सकाळी शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून रोड शो रॅली काढण्यात आली व जिल्हा क्रीडा संकुल मार्गे संस्थागार, गोंदिया येथे संपन्न झाली. कार्यक्रम स्थळी कृषि विभागामार्फत विविध स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषि अधिकारी पवन मेश्राम यांनी मानले.