पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ” विकासरथ ” चित्ररथाचा शुभारंभ

0
17
जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
वाशिम दि.२– पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज २ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या नियोजन भवन येथे महत्वपूर्ण सर्वसाधारण योजनांवर आधारित सचित्र माहिती असलेल्या ” विकासरथ ” या चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आमदार सर्वश्री ऍड.किरणराव सरनाईक,धीरज लिंगाडे,राजेंद्र पाटणी,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,पोलीस अधीक्षक अनुज तारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३ -२४ या वर्षात महत्त्वपूर्ण सर्वसाधारण योजनांची माहिती नागरिकांना आणि लाभार्थ्यांना व्हावी, ही माहिती घेऊन त्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा,हा या चित्ररथ प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे. विकासरथावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मनोधैर्य योजना,लेक लाडकी,प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान,एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आदी योजनांची सचित्र माहिती देण्यात आली आहे.
विकासरथावरून १४ योजनांच्या जिंगलच्या ध्वनिफीत ऐकता येणार आहे.यामध्ये मनोधैर्य योजना,वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू ,अपंगत्व किंवा जखमी झाल्यास अर्थसहाय्य, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य, एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम, दुधाळ जनावरांचे गटवाटप,प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,शुभमंगल सामूहिक विवाह योजना व लेक लाडकी आदी योजनांचा समावेश आहे.हा विकासरथ जिल्ह्यातील १२० गावात जाऊन महत्वपूर्ण असलेल्या या योजनांचा लाभ घेण्यास नागरिकांना व लाभार्थ्यांना प्रोत्साहित करणार आहे.
संबंधित गावातील नागरिकांनी व लाभार्थ्यांनी आपल्या गावात
” विकासरथ ” आल्यावर त्यावरील माहिती जाणून घेऊन आणि ध्वनिफीत ऐकून त्या योजनांचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे