
गोंदिया : येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गुरुवारला गोळीबार करुन जखमी करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गोंदियाचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात नेमलेल्या तपास पथकाने चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात दोघे गोंदियाचे व दोघे नागपूरचे असून इतर आरोपींचा शोध अजून घेतला जात आहे.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चौघांची कसून चौकशी करण्यात येत आहे.माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबारात त्यांच्या कमरेला उजव्या बाजूला गोळी लागली होती. गोळीबारात जखमी झालेल्या लोकेश यादव यांना नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.लोकेश यादव यांच्यावर गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या हेमूू काॅलनीतील यादव चौक या ठिकाणी गोळीबार करण्यात आला होता.मिळालेल्या माहितीनुसार गोंदियातील दोघे आरोपीची कल्लू यादव यांच्यासोबत ओळख असल्याचे बोलले जात आहे.