काँग्रेसची विभागीय बैठक गडचिरोलीत; प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला राहणार उपस्थित

0
4

गडचिरोली : काँग्रेस पक्षाची विभागीय आढावा बैठक आता नागपूरऐवजी गडचिरोली येथे होणार आहे. २० जानेवारी रोजी धानोरा मार्गावरील महाराजा सेलिब्रेशन हॉल ॲण्ड लॉनमध्ये प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबई येथे काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात राज्यभरातून पदाधिकारी सहभागी झाले होते.

यादरम्यान लोकसभानिहाय इच्छुकांचे अर्ज सादर करण्यात आले. त्यावर चर्चादेखील झाली. त्यामुळे विभागस्थरावर आढावा घेऊन लोकसभा उमेदवारांची नावे अंतिम करण्यात येणार आहे.काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे १८ ते २० जानेवारी, असे तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. १८ जानेवारी रोजी अमरावती येथे, तर २० जानेवारीला गडचिरोली येथे विभागीय आढावा बैठक घेणार आहेत. १९ जानेवारी रोजी ते नागपुरात असतील. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते व्यक्तिगत भेटी घेणार आहेत. या दोन्ही बैठकांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह स्थानिक माजी मंत्री व प्रमुख नेते उपस्थित राहतील.