यवतमाळ : पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हान घाटात नाल्याच्या पुलावरून ऍपे वाहन कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चार महिला आणि एक पुरुष असे पाच जण ठार झाले, तर १२ जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये दोन, तीन लहान मुलांचाही समावेश आहे. हा अपघात दुपारी १२ वाजताच्या सुमारास झाला.हे सर्वजण पुसद तालुक्यातील मोहा तांडा, गोकी तांडा व पांढुर्ना गावातील आहेत. ते मालवाहू ऍपे वाहनात बकरा घेऊन वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे नवस फेडायला जात होते. बेलगव्हान घाटात वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो पुलावरून खाली कोसळला. वाहनामध्ये जवळपास १५ ते २० लोक असल्याची माहिती आहे. पोलीस मृतांची आणि जखमींची ओळख पटवत असून अधिक तपास करीत आहेत. जखमींना पुसद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.