
गडचिरोली : पुण्यात पोलिसांना शरण आलेला नक्षलवादी संतोष शेलार उर्फ पेंटर दोन वर्षांपूर्वी चकमकीत ठार झालेला नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याचा अंगरक्षक होता. १४ वर्षांपूर्वी मिलिंद तेलतुंबडे आणि त्याची पत्नी अँजला सोनटक्के यांच्या प्रभावात येऊन संतोष नक्षलवादी चळवळी सहभागी झाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. प्रकृती अस्वस्थामुळे त्याने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.७ नोव्हेंबर २०१० रोजी पुण्यातील कासेवाडी परिसरातून संतोष शेलार(३३) बेपत्ता झाला होता. पोलीस दरबारी असलेल्या नोंदीत सुरवातीला कबीर कलामंचमध्ये सक्रिय असलेला संतोष पुढे नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे आणि त्याची पत्नी अँजला सोनटक्केच्या संपर्कात आला. नक्षलवादी चळवळीला शहरी भागात पोहोचवण्याची जबाबदारी घेतलेल्या तेलतुंबडे दांपत्याने त्यावेळेस मुंबई पुणे परिसरातील अनेक तरुणांना नक्षल चळवळीत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात संतोषही होता. १४ वर्षांपासून तो गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर सक्रिय होता.नक्षल्यांच्या विविध विभागात महत्वाच्या पदावर राहिलला संतोष चळवळीत ‘पेंटर’ म्हणून प्रसिद्ध होता. त्याने छत्तीसगड-गडचिरोली परिसरात अनेक हिंसक कारवाया घडवून आणल्या. त्याचे छत्तीसगड पोलिसांच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीत नाव होते. सद्या त्याला छत्तीसगडमधील बालाघाट जिल्ह्यातील मलाजखंड दलममध्ये ‘एरिया कमांडर’ पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याच्या खास मर्जीतील व्यक्ती म्हणून संतोषची चळवळीत ओळख होती. मिलिंदने त्याला अंगरक्षक म्हणून स्वतःच्या वर्तुळात ठेवले होते. परंतु दोन वर्षांपूर्वी गडचिरोली सीमेवरील मर्दिनटोला येथे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मिलिंदसह २८ नक्षलवादी ठार झाल्याने चळवळीला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे, या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये नक्षल नेत्यांची संख्या अधिक होती. तेव्हापासून नक्षलचळवळ खिळखिळी झाल्याचे चित्र आहे.त्यामुळेच अनेकांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. संतोषदेखील मागील काही महिन्यांपासून आजारी आहे. काही दिवसांपूर्वीच तो पुण्यात उपचाराकरिता आला होता. सद्या त्याच्यावर उपचार सुरू असून महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथक त्याच्यावर नजर ठेऊन आहेत. संतोषच्या आत्मसमर्पणामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.