‘मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा” – डॉ. शरद मेश्राम

0
23

अर्जुनी मोर.–येथील दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या पंधरवडाच्या निमित्ताने मराठी भाषा संवर्धन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी न्यायाधीश नेहा साहू, प्रमुख पाहुणे एस.एस.जायस्वाल महाविद्यालयातील मराठीचे प्रा.डॉ. शरद मेश्राम तसेच न्यायालयातील वकील मंडळी जी.डी.अवचटे,एम.एन.भाजीपाले,एस.आर.काटेखाये,टी.के.शहारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ शरद मेश्राम यांनी मराठी भाषेला महान असा इतिहास लाभलेला आहे. मराठी भाषा ही प्रबोधनाची भाषा आहे, मराठी भाषेत अतिशय महत्त्वपूर्ण ज्ञान साधने उपलब्ध आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून तर आज अगदी आधुनिक काळापर्यंत मराठी भाषा समृद्ध आणि संपन्न होत आहे. मात्र सध्याच्या जागतिकीकरणाच्या आणि विज्ञान युगात मराठी भाषेवर काही परकीय भाषांचं आक्रमण वाढत आहे की काय असे वाटू लागले आहे. या परकीय भाषेच्या आक्रमणातून मराठीला वाचविण्यासाठी या भाषेचा अधिक प्रचार प्रसार आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा अभिमान बाळगायला हवा असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जी. डी. अवचटे यांनी न्यायालयीन कामकाजामध्ये सध्या मराठी ही भाषा अनिवार्य केलेली असून मराठी हे मातृभाषा असल्याने प्रत्येकाला आपले म्हणणे मातृभाषेतून स्पष्ट करण्यासाठी सोपे जात असल्याने न्यायप्रक्रिया अधिक सुलभ झाली असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषण करताना मान. न्यायाधीश नेहा साहू यांनी आपले व्यवहार हे आपल्या मातृभाषेतून असल्यास आपले व्यवहार हे अधिक सुलभ होत असतात आणि यातून संवाद व्यवहार सुद्धा अतिशय चांगला होत असतो. तेव्हा जास्तीत जास्त आपण आपल्या मातृभाषेचा आपल्या व्यवहारात उपयोग करावा असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार टी .डी.कापगते यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य पक्षकार मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश खंडाईत, बी के क्षीरसागर, ए व्ही. भंडारे, राहुल हर्षे, आर एस खिल्लारे इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.