धाराशिव,दि.31: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, धाराशिव स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत आरोग्य,शिक्षण व जनजागृती करण्यासाठी 30 जानेवारी 2024 कुष्ठरोग निवारण दिन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रन फॉर लेप्रसी धाराशिव मॅरेथॉन 2024 तुळजापूर शहरात जवाहर जवाहर नवोदय विद्यालय या शाळेच्या क्रीडा मैदानावर 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय व श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेतील 350 विद्यार्थी सहभागी झाले होते.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कुष्ठरोगाबाबत माहिती देणे,प्रतिज्ञा घेणे, जिल्हाधिकारी यांचे आवाहनाचे वाचन,सपना संदेशाचे वाचन,कुष्ठरोग म्हणी,रांगोळी,गाणी व धावण्याच्या स्पर्धा इत्यादी प्रकारच्या विविध कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य गंगाधर सिंग,उपप्राचार्य सूर्यकांत गायकवाड,सहाय्यक संचालक डॉ.एम.आर.कोरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किशोर घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल घोगरे, राजेंद्र बिलकुले,रवींद्र अलसेट, अशफाक पटेल,हरी जाधव व सुनेत्रा अलसेट हे क्रीडा शिक्षक तसेच अवैद्यकीय पर्यवेक्षक यु.आर.शिंदे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.