सडक अर्जुनी : येथील पंचायत समितीच्या वतीने नवोदय विद्यालयात निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा पंचायत समितीच्या सभागृहात बुधवार, 29 मे रोजी आयोजित करण्यात आला. दरवर्षी जवाहर नवोदय विद्यालय समितीमार्फत इयत्ता सहावीकरिता प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येते. गोंदिया जिल्ह्यातील इयत्ता 6 वीसाठी सर्व 8 तालुक्यातील 5 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता एकूण 80 जागेसाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेण्यात आली. यावर्षी सडक अर्जुनी तालुक्यातील एकूण 80 पैकी 28 विद्यार्थी नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्राप्त झाले. त्यानिमित्त सदर गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे पुरस्कार वितरक तथा मार्गदर्शक म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगणानंथम होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती संगीता खोब्रागडे होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) महामुनी, गटविकास अधिकारी रविकांत सानप, उपसभापती शालिंदर कापगते, गोंदिया जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी वैद्य, सहायक गटविकास अधिकारी दिलीप खोटले, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भूमेश्वर पटले, सुधा रहांगडाले, निशा जनबंधू, कविता रंगारी, चंद्रकला डोंगरवार, पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये ,वर्षा शहारे, शिवाजी गहाणे, दिपाली मेश्राम आदी उपस्थित होते.
यावेळी पंसचे उपसभापती शालिंदर कापगते यांनी 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणवत्ता दर्जा वाढविण्यासाठी नव्याने शिक्षक भरती करणे अशी आपल्या मार्गदर्शनातून मागणी केली. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगणानंथम यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थ्यांनी कठिण परिस्थितीवर मात करून जिवनात यशस्वी व्हावे. समाजात व देशाचे सुसंस्कृत आणि नवोदय विद्यालय शैक्षणिक सुविधांचा उपयोग करून गुणवंत व्हावे. जिल्ह्यातील 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाही. तसेच शिक्षकांची देखील व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासित केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यी, पालक व शिक्षक गुणगौरव म्हणून प्रशस्तीपत्र , मोमेंटो आणि गुलाबाचे फुल देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमात पालक, संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच गटशिक्षणाधिकारी सुभाष बागडे, गटसमन्वयक टी. एम. राऊत, सर्व केंद्रप्रमुख,विषय साधन व्यक्ती सुनील राऊत, अनिल वैद्य, जनाबाई कटरे , कु.नेकेश्वरी पटले, होमराज मेश्राम, समावेशित शिक्षण तज्ञ प्रदीप वालदे, रवींद्र गुरनुले, विशेष शिक्षक कु.डोंगरे, श्री फुंडे, श्री बोपचे, सहायक लेखा विभागाच्या ,कु. बाडेबुचे आणि पंचायत समिती सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय साधन व्यक्ती सुनील राऊत यांनी केले तर आभार गटसमन्वयक टी. एम. राऊत यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रदीप वालदे, अनिल वैद्य, जनाबाई कटरे व इतरांनी सहकार्य केले.