वडनेरच्या पोलीस निरीक्षकांचा झोपेतच मृत्यू ; पोलीस विभागात खळबळ

0
196

वर्धा दि.२९:जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेरच्या एका पोलीस निरीक्षकांचा रात्री झोपेतच मृत्यू झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मनोज वाढीवे असं मृत पोलीस निरीक्षकाच नाव आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत याबाबत माहिती जाणून घेतली.वडनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे हे शुक्रवारी रात्री पोलीस स्टेशनमधील काम आटपून परिसरातील शासकीय निवासस्थानात आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांकडून पोलीस निरीक्षक यांना कामाकरिता वारंवार मोबाइल फोनवर संपर्क करण्यात आले. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.

पोलीस कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान गाठत दार वाजवले. मात्र आतमध्ये मनोज वाढीवे मृत अवस्थेत पडले असतील याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. पोलिसांनी बाहेरून बराचवेळ दार वाजवले, पण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी दार तोडण्याचा निर्णय घेतला.

घरात प्रवेश करताच पोलीस निरीक्षक हे मृत्वस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू हा झोपेत हृदयविकाराचा धक्का आल्याने झाल्याचं सांगण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरात आणि पोलीस प्रशासनात खळबळ माजली असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.