35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News तिन वर्षांपासून बेपत्ता असलेले वयोवृद्ध झळकले मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत

तिन वर्षांपासून बेपत्ता असलेले वयोवृद्ध झळकले मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत

0
361

blank

३ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीत फोटोकुटुंबीय चक्रावले

पुणे:–नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शिंदे सरकारकडून ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकार देवदर्शन घडवणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या या खास योजनेची चर्चा सुरू असतानाच आता वेगळच प्रकरण समोर आले आहे. तीन वर्षांपासून घरातून बेपत्ता असलेली व्यक्ती या योजनेच्या जाहिरातीवर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.हा प्रकार उघडकीस येताच या वयोवृद्धाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे.

विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवत महायुती सरकारने अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’ची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन यात्रा घडवण्यात येणार आहे. या योजनेची महायुती सरकारने जाहिरातबाजी सुरू केली आहे. या योजनेच्या जाहिरातीमध्ये एका वयोवृद्धाचा फोटो वापरला आहे. ही जाहिरात प्रसिद्ध होताच या जाहिरातीमधील वयोवृद्धाच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला. या जाहिरातीमध्ये ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो वापरला आहे. पण पुणे जिह्यातल्या शिरुर तालुक्यातील ज्ञानेश्वर तांबे हे मागील ३ वर्षांपासून बेपत्ता आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. पण ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’च्या जाहिरातीमध्ये तांबे यांचा फोटो प्रसिद्ध होताच त्यांच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की, “आमचे वडील गेले तीन वर्षापासून हरवले होते. आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो परंतु ते सापडत नव्हते. आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे, मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे,” ही विनंती केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात समाजमाध्यमावर पोस्ट करीत महायुतीच्या या जाहिरातबाजीवर संताप व्यक्त केली आहे. सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्याच्या नादात एका कुटुंबीयांच्या भावनांशी खेळत असल्याचा टीका होत आहे.

जाहिरात सरकारी नसल्याची सारवासारव

*हा प्रकार उघडकीस येताच राज्य सरकारने तातडीने खुलासा केला आहे. ही सरकारची जाहिरात नाही. कोणत्याही समाजमाध्यमावर शासकीय खात्यावरून हे ग्राफिक्स पोस्ट करण्यात आलेले नाही. तसेच इतर कोणत्याही माध्यमातून शासनामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली नाही, असा दावा सरकारने केला आहे.

blank