25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Top News आदिवासी आश्रमशाळांची विशेष तपासणी मोहीम आयुक्त मुंडेंचा धडक आदेश

आदिवासी आश्रमशाळांची विशेष तपासणी मोहीम आयुक्त मुंडेंचा धडक आदेश

0
10

गडचिरोली (विष्णू वैरागडे)–राज्यातील आदिवासी शासकीय/अनुदानित आश्रमशाळा, निवासी शाळा व विद्यार्थी वसतिगृहांमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच त्याअंतर्गत नियम व विनियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविणेबाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागीय सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग यांना आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या २४ जुलै २०२६ च्या पत्राचा संदर्भ देत ३१ जुलै २०२६ ला आदेश निर्गमित केल्याने आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
राज्यातील विविध आदिवासी शासकीय आश्रमशाळा, निवासी शाळा व विद्यार्थी वसतिगृहांमध्ये वेळोवेळी अन्न विषबाधेच्या घटना घडत असून अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण अन्न उपलब्ध करून देणे ही संबंधित संस्थांची तसेच अन्न सुरक्षा यंत्रणेची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. अन्न विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच त्याअंतर्गत नियम व विनियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी संदर्भाधीन पत्रान्वये अनुसूचित जमाती क्षेत्रातील आश्रमशाळा, निवासी शाळा व विद्यार्थी वसतिगृहांमध्ये अन्न सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने, सर्व सह आयुक्त (अन्न) यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पदनिर्देशित अधिकारी व अत्र सुरक्षा अधिकारी यांच्यामार्फत राज्यातील शासकीय/अनुदानित आश्रमशाळा, निवासी शाळा व विद्यार्थी वसतिगृहांची विशेष तपासणी करून कार्यवाही करण्यात यावे असे म्हटले आहे.