24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ वाघाडी नदीला पूर, तरीही नेला ट्रक;बचाव पथकाने तिघांना वाचवले

वाघाडी नदीला पूर, तरीही नेला ट्रक;बचाव पथकाने तिघांना वाचवले

0
313

वर्धा : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार वृष्टीने जिल्हा जलमय झाला असून ग्रामीण भाग त्रस्त झाल्याचे चित्र आहे. त्यातच नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले. लहान पुलावरून पाणी वाहू लागले असल्याने वाहतूक न करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. मात्र काही बहाद्दर त्यास जुमानत नाहीच. जाम येथे जाण्यासाठी टाटा आयशर ही गाडी माल घेऊन निघाली होती. वाटेत वाघाडी नदीवर पूल असून त्यावरून पाणी वाहू लागले होते. मात्र चालकाने त्याची तमा नं बाळगता गाडी पाण्यात टाकली. पाण्याचा वेग अनावर असल्याने ही गाडी सरकत सरकत नदीत पडली. चालकासह विलास शहाणे व हिरालाल गुज्जर हे कसेबसे गाडीतून निघत झाडाला लटकले. बराच वेळ ते झाडाला लटकून होते. ही घटना पाहणाऱ्यांनी लगेच प्रशासनास कळविले. बचाव चमू लगेच घटनास्थळी पोहोचली. त्यांनी पाण्यात उडी मारून तिघांनाही वाचविले. तहसीलदार कपिल हटकर यांनी मोठ्या प्रयत्नांनी तिघांचे प्राण वाचल्याचे नमूद केले. चालकास पाण्यात गाडी नं टाकण्याची विनंती इतर दोघांनी केली होती. पण न ऐकल्याने जिवावर बेतता बेतता राहले, अशी भावना सुखरूप असलेल्या विलास शहाणे याने व्यक्त केली.सतत वृष्टी सूरू असल्याने ग्रामीण रस्ते उखडले आहे तर काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. आज विखनी नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद पडला आहे. तर सेलू तालुक्यातील पहिलाणपूर ते दहेगाव गोसावी हा मार्ग पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प पडली. गाडी वाहून जाण्याची घटना घडलेल्या भागात चांगलीच वृष्टी सूरू आहे. समुद्रपूर तालुक्यातील जाम, गिरड, वयगाव, कांधली, माणगाव, या महसूल मंडळात सरासरी ८० ते ८८ मिमी पावसाची नोंद झाली. एकूण ५२७ मिमीची पर्जन्य नोंद झाली.