पुरोगामी महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना,प्रशासनाकरीता लाजिरवाणे-राज ठाकरे

0
110

लोकप्रतिनिधी विकल्या गेल्याचा आरोप महाराष्ट्राला कलंक

गोंदिया,दि.२१- आज प्रशासनाचा धाकच गुन्हेगारांवर राहिलेला नाही. त्यामुळेच प. बंगालच्या कोलकाता आणि महाराष्ट्रातील बदलापूर सारख्या घटना घडताना दिसतात. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना ही येथील प्रशासनाला लाजिरवाणी बाब असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोंदियात मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना व्यक्त केले.या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे, गोंदिया जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे,तालुका अध्यक्ष मुकेश मिश्रा आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार गोंदिया जिल्हयातील गावोगावी, घराघरापर्यंत पोहोचविण्याकरिता प्रत्येक मनसैनिकांनी आजपासूनच सज्ज व्हावे लागणार आहे. पुढील १५ नोव्हेंबरपर्यंत निवडणुका अपेक्षित असल्यामुळे वेळ कमी उरलेला आहे. पण या कमी वेळातच अधिक गतिने प्रत्येक मनसैनिकाला धाव घ्यावी लागणार आाहे. आपण पुढील दोन महिन्यांत केलेल्या कर्तबगारीमुळे आपण यशापर्यंत जरी पोहोचलो नाही तरी जवळपास पोहोचू, असा विश्वास व्यक्त करित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार गोंदिया जिल्ह्यातील घराघरापर्यंत पोहोचवा, असे आवाहन गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

निगरगट्ट प्रशासनामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. पण येथील शासनाला याचं काहीही सोयरसुतक राहिलेला नाही असे दिसत आहे. एक एसआयटी नेमून दिली, जलदगती न्यायालयात प्रकरण दाखल केले की झाले मोकळे, अशा प्रकारे शासन व्यवस्था चालते का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना उद्देशून या प्रसंगी विचारला. आज महाराष्ट्रातील राजकारणाचा काय विचका करून ठेवला आहे, एका एका आमदारांवर ५० खोके घेवून स्वतःला विकल्या गेल्याचे आरोप होतोय, असं महाराष्ट्रात यापूर्वी कधीच ऐकायला मिळत नव्हते, पण आज हे सगळं सर्रास सुरू असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचे शासन जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे आता जनता बदल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आशेचा किरण म्हणून बघत आहे. कोणताही पक्ष सुरुवातीला लहानच असतो. तो प्रस्थापितांशी लढूनच वर येतो.आपल्याला पण आजच्या प्रस्थापितांविरुद्ध लढूनच पुढे यावे लागणार आहे. कुणी संधी देणार नाही. संधी हेरून घ्यावी लागणार आहे. याकरिता पक्षाचा संघठनात्मक गाभा म्हणजेच की शेवटच्या माणसांपर्यंत स्थानिक जिल्हातील पदाधिकाऱ्यांनी पोहोचणे गरजेचे आहे. ते गेल्या १९ वर्षांत या जिल्ह्यात झालेले असल्याचे मला दिसून येत नाही. पुढील दोन महिन्यांत येथील जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष इथपर्यंत तुमची यंत्रणा गेलेली मला दिसून आली तरच मी गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा लढवणार, नाही तर इतर पक्षांकडून सेटिंग करून पैसे कमवायला मी कुणालाही निवडणुकीची तिकीट देणार नाही. पुढील महिन्यात पक्षातील इतर पदाधिकारी तुम्ही केलेली पक्ष बांधणी बघायला येणार आहे. प्रत्येक नियुक्त केलेला माणूस प्रत्यक्ष दाखवावे लागणार असून यातून मला समाधान झाले तरच पुढची वाटचाल सोईस्कररित्या करता येईल असे म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे यांनी आपण शिवसेना सोडून मनसेमध्ये राज ठाकरेसाहेबांच्या नेतृत्वात गेलो तेव्हापासून पक्षाचे काम इमानेइतबारे करीत असून आज साहेबासोबत मंंचावर बसण्यास स्थान मिळाले,हेच आपले यश असून पक्षाकरीता आपण काहीही करायला तयार असल्याचे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.