गडचिरोली –एका सरपंचासह दोन निरपराध व्यक्तींचा खून, सात चकमकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप असलेली जहाल महिला नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी उर्फ सोनी उर्फ सरिता उर्फ कविता (४०,रा.तुर्रेमरका ता. भामरागड) हिने २१ ऑगस्टला पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तर दुसरीकडे नक्षल चळवळीत आंध्र-ओडिशा सीमावर्ती भागात संरक्षण दल कमांडर या महत्वाच्या पदावर राहून चळवळीशी संबंधित माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयातून तेलंगणाच्या हैद्राबाद येथील रहिवासी असलेल्या नेल्सो उर्फ राधा हिची नक्षल्यांनी हत्या केली.
वयाच्या १६ व्या वर्षी नक्षल चळवळीत सामील होऊन तिने शस्त्र उचलले होते. तिच्यावर महाराष्ट्र शासनाचे सहा लाख रुपयांचे बक्षीस होते. २००७ मध्ये छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील नैबरेड दलममध्ये सदस्य म्हणून संगीता पोदाडी ही भरती झाली होती. २००८ मध्ये कोहकामेटा दलम माड डिव्हिजनमध्ये तिची बदली झाली. पुढे तिने महासमुंद दलममध्ये काम केले. २०१४ मध्ये तिला सहायक कमांडर म्हणून बढती मिळाली. कार्यकाळात तिचा छत्तीसगडमधील पाच व ओडिशातील दोन अशा एकूण सात चकमकीत सहभाग होता. छत्तीसगडच्या सोनपूर येथील रस्ता कामावरील ट्रॅक्टर व जेसीबी जाळल्याचा गुन्हाही तिने केला होता. ओडिशात २०१२ मध्ये भरतोंडा जि. बरगड गावातील सरपंचाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०१५ मध्ये तिने जामशेठ व २०१७ मध्ये सालेपल्ली या गावांतील दोन निरपराध व्यक्तींचा खून केला.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून संगीता पुसू पोदाडी हिला एकूण साडेचार लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. तब्बल दोन तप नक्षल चळवळीला देणाऱ्या संगीताने शस्त्र खाली ठेऊन पोलिसांपुढे शरणागती पत्कारली. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा , पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली.
नक्षलवाद्यांकडून महिला नक्षल कमांडरची हत्या
गडचिरोली : नक्षल चळवळीत आंध्र-ओडिशा सीमावर्ती भागात संरक्षण दल कमांडर या महत्वाच्या पदावर राहून चळवळीशी संबंधित माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयातून तेलंगणाच्या हैद्राबाद येथील रहिवासी असलेल्या नेल्सो उर्फ राधा हिची नक्षल्यांनी हत्या केली. २१ ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांच्या आंध्र-ओडिशा विशेष विभागीय समितीचा सचिव गणेश याने पत्रक प्रसिद्ध करून राधाच्या हत्येची कबुली दिली.
हैद्राबाद येथे ‘डीएमएलटी’चे शिक्षण घेत असताना नक्षलावाद्यांच्या कथित चळवळीला प्रभावित होऊन २०१८ मध्ये बंडखोर स्वभाव असलेली पल्लेपती राधा हिने सदस्य म्हणून नक्षल चळवळीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ती भूमिगत होती. यासंदर्भात राधाच्या आईने पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. नक्षल चळवळीत ती नेल्सो उर्फ बंटी राधा नावाने ओळखल्या जायची. नक्षलावाद्यांच्या आंध्र-ओडिशा स्पेशल बॉर्डर झोनल समितीत ती संरक्षक दलाची कमांडर म्हणून कार्यरत होती. या काळात ती मोठ्या नक्षल नेत्यांच्या खास मर्जीतील कमांडर म्हणून देखील ओळखल्या जायची.दरम्याच्या काळात पोलिसांनी तिच्यावर आत्ममर्पण करण्यात दबाव निर्माण केला होता. कुटुंबातील सदस्यांनासुद्धा त्रास देऊ लागले. राधाचा भाऊ सूर्या याला गुप्तचर विभागात नोकरी देण्यात आली. मैत्रिणीच्या माध्यमातून तिला आत्मसमर्पणासाठी आणखी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे राधाने आत्मसमर्पण न करता चळवळीसंदर्भात माहिती देण्यास होकार दिला. गुप्तचर विभागात कार्यरत भाऊ सूर्याच्या ती संपर्कात होती. यामुळे नक्षल चळवळ कमकुवत होण्यास सुरवात झाली होती. पोलिसांच्या आणखी काही मोठ्या योजनात ती सहभागी होती. याची कुणकुण लागताच तीन महिन्यांपूर्वी तिला कमांडर पदावरून हटविण्यात आले होते. अखेर २१ ऑगस्ट रोजी राधाची हत्या करण्यात आली. असे पत्रकात म्हटले आहे. तेलंगणा- छत्तीसगड सीमेवरील कोत्तागुडम जिल्ह्यातील चेन्नपुरमच्या जंगलात तिचा मृतदेह आढळून आला.