25.2 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home गुन्हेवार्ता शिक्षकी पेशाला काळीमा, अमरावतीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

शिक्षकी पेशाला काळीमा, अमरावतीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

0
235

अमरावती : येथील चपराशीपुरा परिसरातील एका शाळेतील शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीच्‍या शरीराला आक्षेपार्ह स्‍पर्श करून (बॅड टच) विनयभंग केल्‍याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करून त्‍याला अटक केली. रियाजउद्दिन शेख शफिउद्दिन शेख (५०) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरण आणि बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्‍न चर्चेत आलेला असताना अमरावतीतही धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपी शिक्षक हा शारीरिक शिक्षण हा विषय शिकवतो. १७ ऑगस्‍ट रोजी सकाळी शाळेच्‍या मधल्‍या सुटीदरम्‍यान एक विद्यार्थिनी भोवळ येऊन खाली पडली. या मुलीला वर्गात बसवण्‍यात आले. सर्व मुले-मुली तिच्‍या भोवती गोळा झाले होते. पीडित विद्यार्थिनी सर्वात मागे होती. त्‍यावेळी आरोपी शिक्षकाने मुलांना बाजूला करण्‍याच्‍या प्रयत्‍नात पीडित विद्यार्थिनीच्‍या शरीराला आक्षेपार्ह पद्धतीने स्‍पर्श केला. त्‍यावेळी पीडित मुलीने शिक्षकाचा हात झटकला आणि ती तेथून बाजूला झाली. यापूर्वी सुद्धा आरोपी शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीला आपण बाहेर फिरून येऊ, असे म्‍हटले होते. ही बाब पीडित मुलीने तिच्‍या आईला सांगितली. पीडित मुलीची आई लगेच शाळेत पोहचली आणि तिने हा प्रकार शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकाला सांगितला. त्‍यानंतर फ्रेझरपुरा पोलीस ठाण्‍यात पोहचून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करून त्‍याला तत्‍काळ अटक केली.