38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ नवीन शैक्षणिक धोरण ठरवताना फुले आंबेडकरांचे दृष्टिकोन बाळगणे गरजेचे – रमेश बिजेकर

नवीन शैक्षणिक धोरण ठरवताना फुले आंबेडकरांचे दृष्टिकोन बाळगणे गरजेचे – रमेश बिजेकर

0
75

blank

*शिक्षण बचाव समन्वय समितीची चर्चा चिंतन बैठक*

*गोंदिया* : नवीन शैक्षणिक धोरण ठरवताना फुले आंबेडकरांच्या दृष्टिकोन बाळगणे आवश्यक होते. तसे न करता शाळा संकुल व क्लस्टरच्या निमित्ताने शाळा व कॉलेज समायोजित (बंद) करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे. १० किलोमीटर अंतरावर एक शाळा संकुल बांधले जाणार आहे. लांबच्या विद्यार्थ्यांना प्रवास भाडे किंवा वाहन उपलब्ध करून देण्याचे राष्ट्रीय शिक्षण धोरणात सुचवले आहे. मात्र, दुसरीकडे कायद्याला डावलले जात असून, शाळांचे व्यापारीकरण केले जात आहे. यावर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी येत्या १५ सप्टेंबर रोजी वर्धा येथे राज्यस्तरीय शिक्षण हक्क आशय परिषदेचे आयोजन केले आहे. अशी माहिती शिक्षण बचाव समन्वय समितीचे राज्य समन्वयक शिक्षण तज्ञ रमेश बिजेकर यांनी दिली.

*१४ वर्षांत सुविधा पुरविल्या नाही*
शिक्षण हक्क कायदा आणि राज्यघटनेचा भंग करून शाळा संकुल उभारले जात आहे. कायद्याप्रमाणे एक किलोमीटरमध्ये प्रथिमिक शाळा, तीन किलोमीटर अंतरावर उच्च प्राथमिक शाळा व पाच किलोमीटर अंतरावर माध्यमिक शाळा उपलब्ध करून देण्याचे कायद्याचे बंधन आहे. वॉशरूम, पाणी, खेळाचे मैदान, किमान दोन शिक्षक, वाचनालय, आदी सोयी पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, गेल्या १४ वर्षांत या सुविधा शाळेत सरकारने पुरविल्या नाहीत. खासगी शाळेत भरमसाट शुल्क घेऊनही गुणवत्तेची हमी नाही. ज्याच्याजवळ पैसा असेल तोच उद्या शिकू शकेल अशी व्यवस्था आज अस्तित्वात आली आहे. शेतकरी, कष्टकरी विद्यार्थांचे शिक्षण सरकारी शाळेतच होऊ शकते. शिक्षणाअभावी ही मुले वडिलोपार्जित कामात ढकलले जातील अशी भिती त्यांनी व्यक्त केली. गोंदिया स्थानिक विश्रामगृह येथे चर्चा चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी शिक्षण बचाव समन्वय समितीचे निमंत्रक प्रभाकर गेडाम, जिल्हा अध्यक्ष वसंत गवळी, कार्याध्यक्ष सि.पी. बिसेन, सचिव अतुल सतदेवे, खेमेंद्र कटरे, अजयसिंग गौर, भोजराज ठाकरे, प्राचार्य रोमेंद्र बोरकर, प्रा.नीलकंठ चीचाम, प्रा. भुमेश्वर शेंडे, मनोज बनसोड, अरुण बन्नाटे, चौधरी सर, पुंडलिक तायडे, देशमुख सर, प्रा.डॉ. दिशा गेडाम, मुख्याध्यापिका उमा गजभिये, रश्मी येसनसुरे, हंसा बावनकर प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वसामान्य गोर गरीब वर्गातील मुलांचे शैक्षणिक भविष्य वाचविण्यासाठी राज्यात शिक्षण बचाव समन्वय समिति पुढाकार घेऊन आवाज बुलंद करीत आहे. आपल्या संत गुरू महामानवानी शिक्षणाचे जीवनात महत्व काय आहे ते सांगितले आहे व राज्य घटनेत मूलभूत हक्क मिळवून दिले आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्याची जवाबदारी आम्हा सर्वांची असून वर्धा येथे होणाऱ्या शिक्षण बचाव परिषदेत अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

blank