
गोंदिया : रायपूर ते नागपूर महामार्ग क्रमांक- ५३ वरील नैनपुर (कोहमारा) येथे ट्रक चालकास धमकावून जबरीने ट्रक मधील डिझेल चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. एवढेच नव्हे तर गुन्ह्यांत वापरलेले दोन चारचाकी वाहन, डिझेल विक्रीतून आलेले पैसे व इतर साहित्य असा ५६ लाख १४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रदिप मोतीलाल यादव (३५, रा. चकनायक जादावावर देवारा, आजमगड-उत्तरप्रदेश) हा ट्रक क्रमांक एमएच ४०-एके २५५७ ने गडचिरोली जिल्हयातील सुरजागड पहाडी वरून आयरन गिट्टी रायपूर जवळील जय बजरंग इस्पात फॅक्टरी मध्ये घेऊन जात होता. २४ सप्टेंबर पहाटे १:४० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नैनपूर येथील आराध्या पेट्रोल पंप जवळ तो थांबला असता २० ते २५ वर्षे वयोगटातील चार अनोळखी तरूण बोलेरो वाहनाने ट्रक जवळ आले. त्यातील एक आरोपी धमकावून ट्रकवर चढला व १६ हजार १०० रूपये किमतीचे १७५ लिटर डिझेल बळजबरीने काढून घेतले. डुग्गीपार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविला होता.
या प्रकरणात डुग्गीपार पोलिसांनी आरोपी हिमांशु ऊर्फ पुटटु राजकुमार विश्वकर्मा (१९, रा. वॉर्ड क्रमांक-१५, खेरमाई मोहल्ला, नैनपुर, जि. मंडला मध्यप्रदेश), सलमान बशीर खान (२७, रा. राजीव कॉलोनी, देवदरा, मंडला- मध्यप्रदेश) यांना अटक केली. त्यांची सखोल चौकशी केली असता दोघांनीही त्यांचे ईतर पाच साथीदार यांच्यासह मिळुन गुन्हा केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यात वापरलेल्या दोन इनोव्हा चारचाकी गाड्या व डिझेल विक्रीतून आलेले पैसे व इतर साहित्य असा एकूण किंमत ५६ लाख १४ हजार ९०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे