बुलढाणा:तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असाल किंवा करणार असाल तर तर तुमच्या वाहनावर देखील दगडफेक होऊ शकते.समृद्धीवरील विविध संकटात आता दगडफेक, या ‘मानवनिर्मित’ संकटाची देखील भर पडली आहे. त्यामुळे किमान रात्री तरी या महामार्गावरुन प्रवास करताना थोडं सावध, जागृत वा दक्ष राहिलेले बरं…
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गा प्रारंभीपासून वादग्रस्त ठरला आहे. लहान मोठे अपघात, अधूनमधून काही भागात होणारी रस्त्याची नादुरुस्ती, मालवाहू वाहनातून होणारी इंधन चोरी, लहानसहान भुरट्या चोऱ्या ते कधी पडणारे दरोडे, होणारी लूटमार असा समृद्धी महामार्गाचा ‘ट्रक रेकॉर्ड’ राहिलाय! एकाचवेळी पंचवीस जणांचा बळी घेणारा भीषण अपघात आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी घटनास्थळी झालेला धार्मिक विधी व महामृत्युंजय जप यामुळे हा मार्ग राज्यात गाजला. आता या मार्गावर दगडफेक या नवीन संकटाची काल सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी भर पडली आहे. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानाने एक भीषण अपघात होता होता वाचला.
सोमवारी रात्री अकरा वाजताच्या आसपास आणि प्रथमच दगडफेकीचा प्रकार घडला. समृद्धी महामार्गावरील चॅनेल नंबर ३०७.१ जवळील देऊळगाव कोळ ते बीबीकडे जाणाऱ्या ‘ओव्हर ब्रिज’वरून (एम एच २९ बीई ६७७७ क्रमांकाची) खाजगी आरामदायी बस जात होती. यावेळी अज्ञात इसमांनी खाजगी बसच्या दिशेने मोठा दगड भिरकावला. परिणामी यामध्ये बसचा समोरील काच फुटला. यामुळे चालक रुपेश माधव रुडे (राहणार मांडवा तालुका डिग्रस, जिल्हा यवतमाळ) प्रवासी राजेंद्र राठोड (वय ४३ वर्षे राहणार महाळुंगी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ) व अनिल गवई (राहणार सारंगपूर वाडी जिल्हा यवतमाळ) हे अंगात काचेचे तुकडे गेल्याने जखमी झाले. मात्र अचानक झालेली दगडफेक आणि उडालेल्या काचेच्या तुकड्यांनी जखमी होऊनही ‘ट्रॅव्हल’ चालक रुपेश रुडे यांनी कमालीचे प्रसंगावधान दाखवत वाहन नियंत्रणात ठेवत सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतले. जर चालकाचे नियंत्रण सुटले असते तर मोठा अपघात घडला असता.
चालक सहित दोन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त होताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत, पोलीस हवालदार विठ्ठल काळुसे, प्रवीण पोळ व महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान श्रावण घट्टे, नागरे यांनी परिसरात दूरपर्यंत आरोपिंचा शोध घेतला. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. जखमी चालक आणि दोन प्रवाशांवर समृद्धी महामार्गावरील ‘ॲम्बुलन्स’मधील डॉक्टर वैभव बोराडे यांनी उपचार केले. तसेच बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील, पोलीस अमलदार अरुण सानप, चव्हाण, भगवान नागरे व इतर कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य केले. तसेच सदरील पुलाजवळचा परिसर पिंजून काढला. मात्र सदर इसम हे मिळून आले नाही. समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलीस अधीक्षक नागपूर, यशवंत सोळंके यांच्या आदेशाने पोलीसची दोन वाहने सतत ‘नाईट पेट्रोलिंग’ करीत असतात. मात्र त्यातील पोलिसाची नजर चुकून आरोपींनी दगडफेक केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे समृद्धी मार्गावरील प्रवासी आणि वाहनधारक यांच्यात भीती निर्माण झाली आहे.