
अर्जुनी मोरगांव: तालुक्यातील खांबी येथील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळेमध्ये दि.२६ ऑक्टोबर ला महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने वनराई बंधारा बांधण्यात आला.वनराई बंधारा पक्षी, जनावरे, जंगली प्राणी यांची तहान भागविण्यासाठी लाख मोलाची मदत करतो.जलसंवर्धनाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खांबीच्या वतीने खांबी गावच्या दक्षिणेकडे एक किलो मीटर अंतरावर असलेल्या पूर्व पश्चिम वाहणाऱ्या नाल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिका भद्रावती काळसर्पे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सुमारे आठ मीटर लांब व एक मीटर उंच अशा वनराई बंधाऱ्याची इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने वनराई बंधारा बांधण्यात आला. बंधार्यात साठलेल्या संरक्षित पाण्यातून रब्बी हंगामातील पिकांना व भाजीपाला यांना पाणीपुरवठा होऊन गावातील गुरेढोरे व जंगली प्राणी यांना पिण्यासाठी तसेच आसपासच्या विहिरीतील पाण्याचे पातळीत वाढ होण्यास मदत होईल. वनराई बंधारा बांधण्यात शाळा समितीचे अध्यक्ष प्रियंका खोटेले, पोलीस पाटील नेमीचंद मेश्राम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना विषय शिक्षक अरविंद उके यांनी वनराई बंधारा बांधण्याची कार्यपद्धती, उपयोगिता व उपयुक्तता विद्यार्थ्यांना पटवून दिली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे गावात सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.