भंडारा दि.19 : उद्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी साकोली मतदारसंघात प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण केली असून मतदारसंघातील 379 मतदान केंद्रांवर शांततापूर्ण मतदान होण्यासाठी सर्व सोयीसुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेत पोलिंग पार्ट्यांना पोहोचविण्यात आले आहे.
पोलिंग पार्ट्यांची रवानगी पूर्ण
मतदान प्रक्रियेसाठी 1,724 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान साहित्य, ईव्हीएम मशीन आणि आवश्यक उपकरणांसह पोलिंग पार्ट्यांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात आले असून, मतदानानंतर त्यांची सुरक्षित परताव्यासाठीही विशेष वाहतुकीची सोय करण्यात आली आहे. यासाठी 44 मोठ्या बसेस, 17 लहान वाहने आणि झोनल अधिकाऱ्यांसाठी 39 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
साकोली मतदारसंघातील मतदान केंद्रे आणि मतदार
साकोली विधानसभा क्षेत्रात साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. येथे एकूण 326,999 मतदार असून, त्यात 163,594 पुरुष, 163,405 महिला, आणि 8,645 नवमतदारांचा समावेश आहे. विशेषतः 85 वर्षांवरील 2,569 ज्येष्ठ मतदार आणि 3,172 दिव्यांग मतदारांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांसाठी सखी मतदान केंद्रे (3), नवमतदार केंद्रे (3) आणि एक दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.
सुरक्षा आणि सुव्यवस्था
मतदानादरम्यान शांतता राखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आहेत.प्रशासनाने निवडणुकीच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण होणार नाही, यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे यावे आणि लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी मांजे यांनी केले आहे.