गोंदिया,दि.०६ः सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या नावाने महाराष्ट्र राज्य परिक्षा मंंडळ नागपूरने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल दोन शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिल्याने नागपूर परिक्षा मंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे.विशेष म्हणजे संबंधित शिक्षक हयात नसल्याची माहिती संबंधित शाळेने नागपूर बोर्डाला कळविल्यानंतरही बोर्डाने मृत शिक्षकाच्या नावाने आदेश काढले,त्या मृत शिक्षकाचे नाव मिलिंद पंचभाई असे आहे.
दरवर्षी परिक्षा मंडळाच्यावतीने लेखी परीक्षेपूर्वी प्रत्येक शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते.त्यासाठी इतर शाळेतील विज्ञान शिक्षकाला बहिर्गत परीक्षक म्हणून कोणत्याही एका शाळेत पाठविले जाते यासाठी बोर्डाकडून विहित नमुन्यात प्रत्येक शाळेतील विज्ञान शिक्षकांची माहिती मागविली जाते.जिल्ह्यातील सालेकसा येथील जानकीबाई विद्यालयात कार्यरत शिक्षक मिलिंद पंचभाई यांचा सहा महिन्यापुर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने विद्यालयाच्यावतीने बोर्डाला पाठविण्यात आलेल्या शिक्षकांच्या यादीत त्यांचे नाव पाठविण्यात आले नव्हते.तरीही बोर्डाने पंचभाई यांचे नाव सालेकसा तालुक्यातील तिरखेडी आणि बिजेपार या येथील शाळेत जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश काढले.हे आदेश विद्यालयाला मिळताच विद्यालय प्रशासन सुध्दा बोर्डाच्या अजब कारभारामुळे चकीत झाल्याचे बघावयास मिळाले.