37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News दुर्मिळ युरेशियन पाणमांजराची नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नोंद

दुर्मिळ युरेशियन पाणमांजराची नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नोंद

0
219

blank

गोंदिया,दि.२९ः नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे विस्तृत क्षेत्रावर पसरलेले असून त्याचा विस्तार गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आहे. सध्या व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅप च्या माध्यमातून वार्षिक व्याघ्र गणना सुरू आहे व त्यासाठी प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. त्यादरम्यान  युरेशियन पाणमांजर या दुर्मिळ असणाऱ्या प्राण्याची कोका वन परिक्षेत्रात पहिली छायाचित्रणात्मक नोंद झाली आहे. सदर नोंद ही नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व संलग्न भूप्रदेशात या युरेशियन ऑटर ( युरेशियन पाणमांजर) या प्रजातीचा पहिलाच छायाचित्रणात्मक पुरावा आहे. चॅम्पियन आणि सेठ यांच्या भारतीय जंगलांच्या वर्गीकरणानुसार, हे क्षेत्र उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वन (५A/C३) या वर्गात येते.
निरोगी उभयचर (semi aquatic) पर्यावरणाचे सूचक म्हणून काम करून गोड्या पाण्यातील आणि किनारी परिसंस्था राखण्यात पाणमांजर महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात पाणमांजराच्या तीन प्रजाती आढळतात. तीनही प्रजाती वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२, अनुसूची १ अंतर्गत संरक्षित आहे आणि आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) द्वारे धोकाग्रस्त असे वर्गीकृत आहे.व्याघ्र गणनेच्या फेज-IV सर्वेक्षण आणि विश्लेषण नवेगाव नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत वन्यजीव जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत अंकित ठाकूर, यांनी श्री. जयरामेगौडा आर., क्षेत्र संचालक आणि  पवन जेफ, उपसंचालक  यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
भारतात, युरेशियन पाणमांजराचे वितरण प्रामुख्याने हिमालयीन पायथ्याशी, पश्चिम घाट आणि ईशान्य भारतातील काही भागात आढळते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ, लेखक आणि वन अधिकारी, पद्मश्री मारुती चितमपल्ली, यांनी या क्षेत्रात कार्यरत असताना १९७८ मध्ये सध्याच्या गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात या प्रजातीची शेवटची नोंद केली होती. तथापि, या व्याघ्र प्रकल्पातील  उपस्थितीची ही पहिलीच छायाचित्रित नोंद आहे.
हा शोध नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अतिशय संपन्न अशी जैव विविधता दाखवून देत असून यामुळे व्याघ्र प्रकल्प प्रशासन आणि निसर्गप्रेमींसाठी उत्साहवर्धक बाब आहे. तथापि, हे प्रजातींचे वितरण, अधिवास प्राधान्ये आणि संवर्धन आव्हाने समजून घेण्यासाठी लक्ष्यित आणि सखोल संशोधनाची तातडीची गरज देखील अधोरेखित करते.

blank