औषधी निर्माणशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी पटकावले प्रथम तीन पुरस्कार

0
17
-तळेगाव येथील राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमात पुरस्कारांची लयलूट
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी तळेगाव येथील स्पर्धेत पहिले तीन ही पुरस्कार पटकावले आहे. राष्ट्रीय विज्ञान अकादमी इंडिया (NASI) यांच्या सहकार्याने तळेगाव येथील पी. आर. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत पार पडलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रथम तीन ही पुरस्कार प्राप्त करीत संशोधन क्षेत्रात विभागाचा नावलौकिक वाढविला आहे.
प्रथम पुरस्कार – प्रतिक्षा ब्रम्हे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी प्रतीक्षा ब्रम्हे हिने ‘डेव्हलपमेंट ऑफ पर्सनलाईज थ्रीडी बायोप्रिंटेड स्कॅफोल्ड्स फाॅर स्पायनल कॉर्ड इन्ज्यूरी रिपेअर’ या प्रकल्पावर केलेल्या संशोधन कार्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ मध्ये मॉडेल प्रेझेंटेशन श्रेणीत प्रथम पुरस्कार प्राप्त केला. 3D बायोप्रिंटिंगमध्ये तिच्या नवकल्पकतेमुळे प्रकल्पाला परीक्षकांनी पसंती दिली. डॉ. प्रफुल्ल एम. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी निर्माणशास्त्र विभागाने केलेल्या नवीन प्रकारच्या संशोधनाची प्रसंशा होत आहे.
प्रथम पुरस्कार – पूर्वजा *पातंग्रे*
पूर्वजा पातंग्रे या विद्यार्थिनीने ‘इन सिलीको स्क्रिनिंग ॲण्ड β-सायक्लोडेक्सट्रीन नॅनोस्पाॅन्जेस : ए स्ट्रॅटेजी फाॅर ऑप्टिमायझिंग नॅफ्टिफाईन हायड्रोक्लोराइड डिलिव्हरी फॉर इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ डर्मटोफाटोसिस’ या प्रकल्पावर केलेल्या संशोधनासाठी पोस्टर प्रेझेंटेशन श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार मिळवला. डॉ. प्रशांत के. पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वजाने प्रगत औषध वितरण प्रणालीवरील कार्य केले असून डर्माटोफायटोसिस उपचारासाठी एक नवीन प्रणाली दिली आहे.
द्वितीय पुरस्कार – अश्विनी अरमारकर
कु. अश्विनी अरमारकर हिने काॅम्प्युटेशनल स्टडीज ऑन सिजिगियम कुमिनी फायटोकेमिकल्स ऍज इन्सुलिन रिसेप्टर मॉड्युलेटर्स इन दी मॅनेजमेंट ऑफ पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ या संशोधन कार्याबाबत द्वितीय पुरस्कार मिळवला. पीसीओडी ही महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबधित स्थिती आहे. ज्यामध्ये परिपक्व स्त्रीबीजांच निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते. ही आजकाल स्त्रियांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे, जी मुख्यतः हार्मोनल असंतुलनामुळे होते. डॉ. प्रफुल्ल एम. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनीच्या संशोधनाने पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमच्या उपचारासाठी नैसर्गिक फायटोकेमिकल्सचा उपयोग करण्याचा संभाव्य मार्ग दाखविला आहे.
तृतीय पुरस्कार – रोशनी कुंटे
कु. रोशनी कुंटे या विद्यार्थिनीने ‘बाॅक्स बेह्नकेन डिझाइन इन ऑप्टिमायझेशन ऑफ द ग्रीन लिक्विड क्रोमॅटोग्राफिक मेथड फॉर द क्वांटिफिकेशन ऑफ कॅपेसिटॅबाइन इन ड्रग प्रोडक्ट : ॲन एक्यूबिडी अॅप्रोच’ या प्रकल्पासाठी तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. डॉ. प्रफुल्ल एम. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या संशोधनाने औषध उत्पादनांच्या विश्लेषणासाठी एक अधिक पर्यावरणीयदृष्ट्या अनुकूल, अचूक आणि कमीतकमी वेळेत सुधारणा केलेली नवीन पद्धत विकसित झाली आहे.
औषधी निर्माणशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पुरस्कारांमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शकांचे आभार मानले आहे. औषधी निर्माण शास्त्र विषयात नवीन संशोधनासाठी त्यांचे मार्गदर्शन बहुमूल्य ठरल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.