वरुड-आर्वी बसला साहूरच्या टोल नाक्यावर अपघात

0
118

अमरावती,दि.१४ः वरुडवरून आर्वी येथे प्रवासी घेऊन जाणार्‍या वरुड आगाराच्या बसला साहूरच्या मध्यभागी असलेल्या टोल नायावर स्टेअरिंग लॉक झाल्याने अपघात झाला. नशिब बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली, मात्र बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, वरुड आगाराची एम. एच. ४०- ९१२५ क्रमांकाची बस वरुड वरून आर्वी येथे प्रवासी घेऊन जात होती. या बसमध्ये सात प्रवासी होते. वरुड-आर्वी मार्गावर साहूर द्रुगवाड्याच्या मध्यभागी उभारलेल्या टोल नायाजवळ बस आली असता बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बस टोल नायात शिरली.

बस चालक डी. एन. राऊत यांनी बसला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र, स्टेरिंग लॉक झाल्याने काहीच करता आले नाही. त्यामुळे बस टोल नायाच्या दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात बस मधील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही, हे विशेष. अनेक डेपोमध्ये ५० वर्षांपूर्वीच्या जुन्या भंगार गाड्या असल्याने ब्रेक फेल होणे किंवा स्टेरिंग लॉक होणे हे नित्याचे झाले असून या भंगार बसेसमुळे नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे होणारे अपघात हा चिंतेचा विषय असून शासनाने याकडे जातीने लक्ष घालून नवीन बसेसचा भरणा करावा, असे मत चालक-वाहक यांच्यासह प्रवाश्यांनी व्यक्त केले. यावेळी वाहक म्हणून एस. एम. बुरे हे सेवेवर होते. अपघात होताच चालक डी. एन. राऊत यांनी आष्टी पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दिली.