37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ किडंगीपार गावापासून विकसित कृषि संकल्प अभियानाचा शुभारंभ

किडंगीपार गावापासून विकसित कृषि संकल्प अभियानाचा शुभारंभ

0
69

blank

गोंदिया, दि.30 : कृषि विकासाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत गोंदिया जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने किडंगीपार गावापासून विकसित कृषि संकल्प अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विद्या पटले, सरपंच लता उईके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच किडंगीपार गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

         विकसित कृषि संकल्प अभियान हा भारत सरकारचा एक महत्वूपर्ण राष्ट्रीय उपक्रम आहे. सदर उपक्रम दि.29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत राबवला जात आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे गाव पातळीवर आधुनिक, वैज्ञानिक व शाश्वत कृषि पध्दतीचा प्रसार करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतीस अधिक फायदेशीर व पर्यावरणपुरक बनवणे. कार्यक्रमात शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वाटप, पीक उत्पादन वाढीसाठी सल्ला, जैविक आणि सेंद्रीय शेतीची माहिती, तसेच हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करण्यात आले.

        कार्यक्रमा दरम्यान कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी विशाल उबरहंडे, गणेश खेडीकर व किशोर ठाकरे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील शास्त्रज्ञ डॉ.राहुले फुके यांनी बियाणे संदर्भात मार्गदर्शन केले.

       यावेळी जिल्हा परिषद सदस्य विद्या पटले यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या कार्याचे कौतुक करताना असे उपक्रम ग्रामीण भागात शेतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील असे मत व्यक्त केले. सरपंच लता उईके यांनी गावातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतीत बदल घडविण्याचे आवाहन केले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि कृषि संकल्प अभियानातून गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असे सांगितले.

      या अभियानांतर्गत गावातील शेतीची सर्वांगीण माहिती संकलीत करुन गावात एक मॉडेल शेती व्यवस्था उभारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, प्रयोगशाळा आधारित सल्ला, वाण निवड, खत व्यवस्थापन, किड व रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन इत्यादी बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे.

        हा उपक्रम शेतकऱ्यांना ज्ञान, संसाधने व शासकीय योजनांचा लाभ एकाच वेळी देणारा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. कृषि विज्ञान केंद्र गोंदिया व ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून किडंगीपार हे गाव कृषि क्षेत्रात एक आदर्श गाव म्हणून उदयास येईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

blank