सिंगनडोह येथे कुष्ठरोग आरोग्य मेळाव्यात ३२२ लोकांची तपासणी

0
59

गोंदिया,दि.२०ः  जिल्ह्यात कुष्ठरोग शोधण्यासाठी आरोग्य विभाग विविध मोहिमा राबवत आहे. कुष्ठरोग शोध अभियानात संशयित रुग्ण शोधून तपासणीनंतर निदान झाल्यास उपचार करण्यात येतात.त्यातच गोंदिया जिल्ह्याचे कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ.महेंद्र धनविजय यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आरोग्य मेळाव्यातुन कुष्ठरोग आजाराबाबतची तपासणी करण्यात येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदुर/जमी चे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिरेपुंजे यांच्या माध्यमातून 18 जुन रोजी उपकेंद्र सिंगनडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुष्ठरोग आरोग्य मेळावा पार पडला.कुष्ठरोग आरोग्य मेळाव्यात 322 लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातुन 22 संशयित रुंग्णाची सखोल तपासणी दरम्यान तीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आरोग्य विभागाला यश आले. त्यातुन एका रुग्णाला एम.बी. व दोन रुग्णांना पी.बी.असे एकुण तीन रुग्णांना समुपदेशन करुन कुष्ठरोग औषधोपचार सुरु करण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिरेपुंजे यांनी दिली आहे.
दि. 18 जुन रोजी सिंगनडोह येथील कुष्ठरोग आरोग्य मेळाव्यात गावातील संरपंच सोनुजी नैताम,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिरेपुंजे यांचेसह अवैद्यकीय कर्मचारी एस.बोरकर व एस.ए.पंधरे, अवैद्यकीय सहाय्यक डी.पडोळे,आरोग्य सेवक जी.टी.उंदीरवाडे,आरोग्य सेविका एस.वाय. हुमने,आशा सेविका एल.बी.मीरी, आशा गट प्रवर्तक एस.डी.शाहारे यांनी आरोग्य सेवा दिली.
कुष्ठरोग आजाराविषयी- कुष्ठरोग हा आजार जंतूमुळे होतो.एखादा चट्टा फार दिवस अंगावर असेल व त्याला खाज येत नसेल तरी दुर्लक्ष करू नका.कुष्ठरोगाबद्दल समाजात अजूनही खूप गैरसमज व अंधश्रद्धा आहेत.कित्येकांना हा एक भयंकर आजार वाटतो.या आजारात हातापायाची बोटे झडतात व व्यंग येते असेही वाटते.हा आजार म्हणजे एक शाप किंवा कलंक आहे असेही वाटते. पण या सगळ्यात काहीही तथ्य नाही. औषधोपचारानंतर सर्व रुग्ण शंभर टक्के बरे होत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिरेपुंजे यांनी दिली आहे.
कुष्ठरोगाचा अधिविशिष्ट काळ – जंतूमुळे होणाऱ्या प्रत्येक आजाराला अधिविशिष्ट काळ असतो. अधिविशिष्ट काळ म्हणजे जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यापासून रोगाचे पहिले लक्षण दिसण्यामधील कालावधी.कुष्ठरोगाचा अधिविशिष्ट काळ हा २ ते १० वर्षे एवढा आहे . याचे कारण म्हणजे या आजाराचे जंतू हे फार संथ गतीने वाढतात.
कुष्ठरोग हा आजार कसा पसरतो – ज्या व्यक्तीला हा आजार जास्त प्रमाणात असतो त्याच्या नाकातील श्लेषमल त्वचेमध्ये हे जंतू असतात.हा माणूस जेव्हा शिंकतो तेव्हा हे जंतू हवेत पसरतात व त्याचा संसर्ग दुसऱ्यांना होऊ शकतो.पण प्रासंगिक स्पर्शाने हा आजार पसरत नाही.तसेच ज्यांना हा आजार कमी प्रमाणात आहे त्यांचाकडून हा दुसऱ्यांना पसरत नाही.शरीरात शिरकाव केल्यावर हे जंतू व्यक्तीची त्वचा तसेच  नसांना संसर्ग करतात.त्यामुळे या आजाराची लक्षणे ही या दोन ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतात.

या लक्षणांकडे लक्ष देण्याची गरज…
शरीरावर लालसर, न खाजणारा व चकाकणारा डाग किंवा चट्टा, अंगावरील गाठी, कानाच्या जाड झालेल्या पाळ्या, स्नायूंचा अशक्तपणा, चट्ट्याच्या जवळून जाणारी नस जाड बनते व दुखते. ही लक्षणे दिसताच प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासून घ्यायला हवे किंवा आपल्या क्षेत्रातील आशा सेविकांना माहिती द्यायला हवी, प्राथमिक अवस्थेत कुष्ठरोगावर उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होत होतो.
-डॉ.महेंद्र धनविजय, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग)