छत्रपती संंभाजीनगरचे मोटार वाहन निरिक्षक व दलाल एसीबीच्या सापळ्यात अडकला…

0
191
गोंदिया,दि.२६ः-राज्यातील परिवहन विभाग म्हणजे आरटीओ विभागाला भ्रष्टाचाराची किळ लागल्याचे चित्र बघावयास मिळत असून चंद्रपूर,यवतमाळ व भंडारानंतर आता छत्रपती संभाजीनगर मधील मोटार वाहन निरिक्षक व खासगी इसमाला अहिल्यानगर एसीबीने ताब्यात घेतले आहे.ही कारवाई २४ जूनच्या रात्री करण्यात आली.यात राजू मुरलीधर नागरे, वय ३९, मोटार वाहन निरीक्षक, वर्ग-२, नेमणूक प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर,मुळ रा.बेलंझा अपार्टमेंट,पहिला मजला, महात्मानगर,नाशिक व संदीप रामदास ढोले, वय ४२,धंदा -खाजगी एजंट, प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर रा.साईदीप नगर,रो हाऊस नं.८, शिवांशी रेसिडेन्सीच्या बाजूला,बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे.

    सदरहू प्रकरणातील तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचे मालकीचे आयशर कंपनीचे सहा चाकी वाहन आहे. सदर वाहनाने तक्रारदार हे तुरीची डाळ व इतर कडधान्याची जालना ते मुंबई अशी वाहतूक करतात. तक्रारदार यांचे वाहन छत्रपती संभाजी नगरच्या हद्दीतून सुरळीत चालू द्यायचे असेल व तक्रारदार यांच्या वाहनावर ओव्हरलोडची कारवाई होऊ द्यायची नसेल तर हफ्ता द्यावा लागेल असे सांगून आरोपी संदीप रामदास ढोले (खाजगी एजंट) प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर याने राजू नागरे,मोटर वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर याचे करिता २०,००० रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी यांच्याविरुद्ध लाच मागणीची तक्रार नोंदवलेली होती. दि.२३/६/२०२५ रोजी लाच मागणीची  पडताळणी करण्यात आली होती.

दरम्यान आरोपी संदीप रामदास ढोले याने राजू मुरलीधर नागरे, मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर याचे करिता तक्रारदार यांचेकडे २०,००० रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती १८,००० रुपये लाचेची मागणी केली. दि.२३/६/२०२५ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान राजू मुरलीधर नागरे याने आरोपी संदीप रामदास ढोले यास सुविधा पुरविल्याचे निष्पन्न झाले. दि २४ जून रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी संदीप रामदास ढोले याने तक्रारदार यांच्याकडून १८,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. यासाठी राजू मुरलीधर नागरे,मोटार वाहन निरीक्षक याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास संदीप रामदास ढोले यांस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले असून लाचखोरी प्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध वेदांतनगर पोलीस स्टेशन,जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.